कोरोनाची साथ अजूनही संपलेली नाही

-‘डब्ल्यूएचओ'च्या प्रमुखांचा इशारा

Nucleic-acid-testingजीनिव्हा/वॉशिंग्टन – अमेरिका व युरोपसह जगाच्या विविध भागांमध्ये कोरोनाचे नवे उद्रेक समोर येत असून ही साथ अजूनही संपलेली नाही, असा इशारा ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) दिला. मंगळवारी जीनिव्हात झालेल्या बैठकीदरम्यान, ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रॉस घेब्रेयेसूस यांनी युरोप व अमेरिकेत ‘ओमिक्रॉन सबव्हेरिअंट’चे रुग्ण वाढत असल्याकडेही लक्ष वेधले. वाढता संसर्ग रोखण्यासाठी संबंधित देशांनी पुन्हा प्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी सुरू करायला हवी, अशी सूचनाही ‘डब्ल्यूएचओ’च्या प्रमुखांनी केली.

Corona-epidemicजगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 56 कोटींनजिक पोहोचली असून 63 लाखांहून अधिक जण या साथीत दगावले आहेत. मे महिन्यात कोरोनाच्या साथीची तीव्रता कमी होत असल्याचे संकेत मिळाले होते. मात्र गेल्या महिन्याभरात चित्र बदलले असून अमेरिका, युरोप तसेच चीनमध्ये रुग्णसंख्येत भर पडताना दिसत आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत तब्बल 30 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. जूनच्या अखेरच्या आठवड्यात ब्रिटनमध्ये तब्बल 21 लाख रुग्णांची भर पडली. तर गेल्या काही दिवसात जर्मनी, फ्रान्स व इटली या देशांमध्ये प्रतिदिनी लाखाहून अधिक रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे.

epidemic-Coronaअमेरिकेतही दर दिवशी आढळणाऱ्या रुग्णांची संख्या एक लाखांवर पोहोचली आहे. 24 तासांमध्ये दगावणाऱ्या रुग्णांची सरासरीही 500 नजिक नोंदविण्यात आली. ही वाढती संख्या नव्या लाटेचे संकेत असल्याचे अमेरिकी यंत्रणा तसेच तज्ज्ञांनी बजावले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार डॉक्टर अँथनी फॉसी यांनी, अमेरिकी जनतेला ‘बूस्टर डोस’ घेण्याचे आवाहन केले. नागरिकांमधील प्रतिकारक्षमता कमी होत असल्याने बूस्टरची आवश्यकता असल्याचे फॉसी यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी अमेरिकी नागरिकांनी पुन्हा मास्कचा वापर सुरू करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

कोरोना साथीचे मूळ ठरलेल्या चीनमध्येही नवा उद्रेक सुरू असून दररोज 300 ते 500 रुग्ण आढळत आहेत. अमेरिका व युरोपमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमागे ‘ओमिक्रॉन’चे उपप्रकार कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले. ‘बीए डॉट4′(इअ.4) व ‘बीए डॉट5′(इअ.5) हे व्हेरिअंट सक्रिय असल्याचे निरीक्षण ‘डब्ल्यूएचओ‘ने नोंदविले आहे. त्याचवेळी अनेक देशांनी शिथिल केलेले आरोग्यविषयक तसेच सामाजिक निर्बंध हेदेखील वाढत्या रुग्णसंख्येमागील महत्त्वाचे कारण असल्याकडेे जागतिक आरोग्य संघटनेने लक्ष वेधले.

अमेरिका व युरोपव्यतिरिक्त लॅटिन अमेरिकेतील ब्राझिल तसेच आशियातील दक्षिण कोरियामध्येही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे समोर आले आहे. ब्राझिलमध्ये दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 50 हजारांपेक्षा अधिक असून दगावणाऱ्यांची संख्या सरासरी 300हून जास्त आहे.

leave a reply