‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मधील प्रगतीसाठी देशाने सज्ज व्हावे

-संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचा संदेश

नवी दिल्ली – “पुढच्या काळात ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आघाडीवर असलेला देश जगावर हुकूमत गाजविल, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले होते. भारताची जगावर हुकूमत गाजविण्याची इच्छा नाही, भारत जगाकडे विशाल कुटुंब म्हणूनच पाहतो. तरीही आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात देशाने झपाट्याने प्रगती करायला हवी. यामुळे दुसरा कुठलाही देश या तंत्रज्ञानाच्या बळावर भारतावर वर्चस्व गाजविण्याचा विचारही करू शकणार नाही”, असा संदेश संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला.

Artificial-Intelligenceनवी दिल्लीच्या विज्ञान भवनात संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन डिफेन्स-एआयडीए’ या परिसंवादात संरक्षणमंत्री बोलत हेोते. 75 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून यावेळी संरक्षणक्षेत्राशी निगडीत असलेल्या आर्टिफिशल इंटेलिजन्सवर चालणारी 75 उत्पादने यावेळी सादर करण्यात आली. यावेळी आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात एआयचे महत्त्व संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केले. त्यासाठी एआय तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या उद्गारांचा दाखला यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला.

आपल्या विरोधात कुणी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार देखील करणार नाही, इतकी क्षमता भारताला प्राप्त करावी लागेल. मात्र मात्र एआयचा वापर भारताला विघातक नाही, तर विधायक कार्यासाठी करायचा आहे. भारताला कुणावर वर्चस्व गाजवायचे नाही. तर या तंत्रज्ञानाचा मानवी जीवनाच्या विकासासाठी हे भारताचे ध्येय असेल, असे राजनाथ सिंग पुढे म्हणाले. जेव्हा कधी नव्या तंत्रज्ञानाचा अविष्कार होतो, त्यावेळी बदल घडतात आणि या बदलांकडे अत्यंत गांभीर्याने पाहणे भाग ठरते. एआय तंत्रज्ञानामुळे होणारे अफाट बदल लक्षात घेता यामुळे कायदेशीर, राजकीय, नैतिक आणि आर्थिक पातळीवर नवे प्रश्न उभे राहतील. त्याला तोंड देण्याची तयारी आपण आत्तापासूनच करायला हवी, असे संरक्षणमंत्र्यांनी बजावले आहे. नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना समाजाला वेळ लागतो, याकडेही संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले.

एआयमुळे संरक्षणक्षेत्रातही फार मोठे फेरबदल होत आहेत. सैनिकांचे प्रशिक्षण एआयमुळे अधिक उत्तमरित्या होऊ शकते. त्याचबरोबर एआयमुळे कुठल्याही नियंत्रणाखेरीज शत्रूची ठिकाणे नष्ट करण्याची क्षमता प्राप्त करता येऊ शकते. तसेच एआयचा वापर करून संरक्षणसाहित्याचा वापर अधिक प्रभावीपणे करता येऊ शकतो. पुढच्या काळात एआयचा या क्षेत्रातील वापर अधिकच वाढेल, असे सांगून संरक्षणमंत्र्यांनी या एआयच्या वाढत्या प्रभावाची जाणीव करून दिली.

भारताने मानवरहित विमानांसाठी एआयचा वापर सुरू केलेला आहे. पण या क्षेत्रात भारताला अधिक प्रगती साधावी लागेल. यामुळे भारत स्वतंत्र शस्त्रप्रणाली विकसित करू शकेल. संरक्षण क्षेत्रात एआय व बिग डेटा यांचा वेळेतच वापर सुरू करायला हवा. यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देश मागे राहणार नाही, असे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.

leave a reply