सप्टेंबर महिन्यात देशाची निर्यात सहा टक्क्यांनी वाढली

नवी दिल्ली – गेल्या सहा महिन्यात प्रथमच निर्यातीत वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात सहा टक्क्यांने वाढल्याचे वृत्त आहे. अभियांत्रिकी वस्तू, पेट्रोलियम उत्पादने, औषध आणि रेडिमेड कपड्यांच्या मागणीत वाढ झाल्याने निर्यातीमध्ये वाढ झाली. मात्र त्याचवेळी आयत १९.६ टक्क्यांनी घसरल्याने व्यापारी तुटीमध्ये घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात व्यापारी तूट २.७२ अब्ज डॉलर्सवर मर्यादित राहिली आहे. गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात हिच व्यापारी तूट ११.६७ अब्ज डॉलर्स होती.

जगभरात फैलावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून भारतासह जगभरातच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्याचा मोठा फटका मागील सहा महिन्यापासून निर्यात क्षेत्राला बसला आहे. मात्र सप्टेंबर महिन्यात ६ टक्क्यांची वाढ होत निर्यात २७.५८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. तर आयात १९.६ टक्क्य़ांनी घसरत ३०.३१ अब्ज डॉलर्सवर मर्यादित राहिली आहे.

त्यामुळे आयात-निर्यातीमधील तूट कमी झाली आहे. गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ही तूट जवळपास पाच पट अधिक होती. देशाची निर्यात ५.३ टक्क्यांवर राहील आसा अंदाज होता. मात्र वर्तवण्यात आलेल्या अंदाजाच्या तुलनेत निर्यातीमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे.

एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत निर्यात २१.३ टक्यांनी घसरत १२५.३ अब्ज डॉलर्स, तर आयात ४०.१ टक्क्यांनी घसरून १४८.७ अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली. त्यामुळे व्यापारी तूट २३.४ अब्ज डॉलर्सपर्यंत खाली घसरली आहे. देशांतर्गत मागणीसह आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीत घट झाल्याचा मोठा फटका निर्यातीला बसला. जून २०१९ पासून सुरू अर्थात मागील १५ महिन्यांपैकी १३ महिन्यांमध्ये देशाची निर्यात नकारात्मक होती.

दरम्यान, देशात गेल्या सहा महिन्यात निर्यातीच्या तुलनेत आयात वेगाने घसरली आहे. इंधन आणि सोन्याची मागणी घटल्याने देशात १८ वर्षात प्रथमच जून महिन्यात ट्रेड सरप्लस नोंदविण्यात आला होता. देशात अभियांत्रिकी वस्तू, फार्मास्युटिकल्स आणि रेडिमेड कपड्यांची वाढती मागणी निर्यात वाढीसाठी महत्वपूर्ण ठरली आहे.

leave a reply