युरोपचे विघटन, अमेरिकेत गृहयुद्ध व इंधनदरांचा भडका

रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांचे भाकित

मॉस्को – जर्मनी, पोलंड व युक्रेनसह काही बाल्टिक देश एकत्र येऊन युरोपात ‘फोर्थ राईश’ची स्थापना करतील. फ्रान्स व ‘फोर्थ राईश’ यांच्यात युद्धाचा भडका उडेल. या युद्धामुळे युरोपचे विघटन होईल आणि पोलंडची पुन्हा फाळणी होईल, असे खळबळजनक भाकित रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष व ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’चे उपाध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी केले आहे. याव्यतिरिक्त अमेरिकेत गृहयुद्धाचा भडका उडणे, डॉलर व युरोचे स्थान धोक्यात येणे, शेअरबाजारांसह प्रमुख बाजारपेठा आशियात स्थलांतरित होणे व इंधनदरांमध्ये विक्रमी वाढ होणे यासारख्या शक्यताही मेदवेदव्ह यांनी वर्तविल्या आहेत.

dimitry medvedevमाजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव्ह यांनी १० मुद्यांचा उल्लेख करून आपली भाकिते मांडली आहेत. ‘नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक जण आपापल्या परीने भविष्यवाणी करीत आहेत. काहींच्या कल्पना असाधारण तर काहींच्या अगदीच मूर्खपणाच्या आहेत. अशात माझेही योगदान देत आहेत. २०२३ सालात काय होते ते पाहू?’ अशा शब्दात मेदवेदेव्ह यांनी आपल्या भाकितांचे समर्थन केले.

ब्रिटन पुन्हा युरोपिय महासंघात सामील होईल. त्यानंतर युरोपिय महासंघ युरोचा वापर करणेही सोडून देईल. महासंघाच्या घसरणीची प्रक्रिया सुरू होईल. जर्मनी, पोलंड, रोमानिया, झेक रिपब्लिक व किव्हमधील राजवट एकत्र येऊन फोर्थ राईशची निर्मिती करतील. या निर्मितीविरोधात फ्रान्स खडा ठाकेल आणि फ्रान्स व फोर्थ राईशमध्ये युद्ध होईल. पोलंडची पुन्हा फाळणी होईल व त्याचवेळी पोलंड व हंगेरी युक्रेनचा काही भाग आपल्या ताब्यात घेतील. युरोपिय महासंघाचे विघटन होईल’, असे भाकित मेदवेदेव्ह यांनी वर्तविले आहे.

अमेरिकेत गृहयुद्धाला तोंड फुटणार असून कॅलिफोर्निया व टेक्सास हे दोन स्वतंत्र देश तयार होतील. अमेरिका व युरोपातील शेअरबाजार तसेच आघाडीच्या बाजारपेठा आशियाइ देशांमध्ये स्थलांतरित होतील. अमेरिकी डॉलर व युरोचे आंतरराष्ट्रीय राखीव चलन म्हणून असलेले स्थान संपुष्टात येईल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व वर्ल्ड बँक कोसळतील आणि ‘ब्रेटन वुड्स सिस्टिम’ची अखेर होईल, असे रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे. अमेरिकेतील गृहयुद्धानंतर टेस्ला व ‘स्पेसेक्स’चे प्रमुख असलेले उद्योजक एलॉन मस्क राष्ट्राध्यक्ष होतील, असा दावाही मेदवेदेव्ह यांनी केला.

कच्च्या तेलाचे दर १५० डॉलर्स प्रति बॅरल तर इंधनवायूचे दर हजार घनमीटरमागे पाच हजार डॉलर्सपर्यंत भडकतील, असेही भाकित मेदवेदेव्ह यांनी वर्तविले आहे.

leave a reply