जर्मन जनतेने आण्विक आणीबाणीसाठी सज्ज रहावे

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इशारा

Inge_Pauliniबर्लिन – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपला आण्विक दुर्घटनेला तोंड द्यावे लागण्याची शक्यता असून जर्मनीतील जनतेने आण्विक आणीबाणीसाठी सज्जता ठेवावी, असा इशारा जर्मनीच्या वरिष्ठ अधिकारी इंग पॉलिनी यांनी दिला. एखादी आण्विक दुर्घटना घडल्यास त्यातून होणारा किरणोत्सर्ग देशांच्या सीमा बघून थांबत नाही, अशा शब्दात पॉलिनी यांनी संभाव्य धोक्याबाबत बजावले.

Grohndeगेल्या काही दिवसात रशियाच्या वरिष्ठ नेत्यांकडून अणुयुद्ध तसेच अण्वस्त्रांच्या वापराबाबत आक्रमक वक्तव्ये करण्यात आली आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अणुयुद्धाचा धोका टळलेला नाही, असा इशारा दिला होता. पुतिन यांनी रशियाची दोन नवी अण्वस्त्रे पुढील वर्षात संरक्षणदलांमध्ये सामील होत असल्याची माहिती दिली होती. रशियाच्या संरक्षण विभागाने राजधानी मॉस्कोनजिक यार्स अण्वस्त्रांची तैनाती होत असल्याचे फोटोग्राफ्स तसेच व्हिडिओही प्रसिद्ध केले होते. तर रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी, रशियाकडे अण्वस्त्रे असल्याने अमेरिकेने त्याविरोधात युद्धाची उघड घोषणा केलेली नाही याकडे लक्ष वेधले होते.

रशियातील या घडामोडींमुळे अणुयुद्धाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्याचवेळी युक्रेनमधील झॅपोरिझिआ व इतर अणुप्रकल्पांनजिक होणारे हल्लेही चिंतेचा विषय ठरले आहेत. जर्मनीच्या ‘फेडरल ऑफिस फॉर रेडिएशन प्रोटेक्शन’च्या प्रमुख इंग पॉलिनी यांनीही या घटनांची जाणीव करून दिली. जर्मन जनतेने याकडे गांभीर्याने पहायला हवे व आण्विक पातळीवर एखादी दुर्घटना घडू शकते या दृष्टिने तयारी करावी, असे पॉलिनी यांनी बजावले.

जर्मनीचे शेजारी असलेल्या अनेक युरोपिय देशांमध्ये नवे अणुऊर्जा प्रकल्प उभे रहात असल्याबाबतही पॉलिनी यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकल्पांमुळे दुर्घटना घडण्याचा धोका अधिकच वाढल्याकडे जर्मन अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. जर्मनीत सध्या तीन अणुऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत.

leave a reply