युक्रेनी प्रांतांच्या विलिनीकरणाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी डॉलर व युरोच्या तुलनेत रशियन रुबल मजबूत स्थितीत

The Russian rubleमॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष युक्रेनी प्रांतांच्या विलिनीकरणाची घोषणा करीत असतानाच पाश्चिमात्य देशांनी रशियाविरोधात नव्या निर्बंधांचे संकेत दिले. पाश्चिमात्यांच्या या इशाऱ्यांनंतरही रशियन चलन रुबल अमेरिकी व युरोपिय चलनांविरोधात अधिक मजबूत झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकी डॉलर सर्वोच्च पातळी नोंदवित असताना जगातील इतर आघाडीच्या चलनांमध्ये घसरण झाली होती. या पार्श्वभूमीवर रशियन चलन भक्कम होणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

शुक्रवारी रशियाच्या ‘मॉस्को एक्सेंज’मध्ये झालेल्या व्यवहारांमध्ये एका अमेरिकी डॉलरसाठी 51.1 रूबल मोजावे लागत होते. जुलै महिन्यानंतर एका डॉलरसाठी 54 पेक्षा कमी रुबल मोजावे लागण्याची ही पहिलीच वेळ ठरते. तर युरोसाठी झालेल्या व्यवहारांमध्ये एका युरोचे मूल्य 51 रुबलच्याही खाली घसरल्याचे दिसून आले. एका युरोसाठी 51 रुबलचा दर ही ऑक्टोबर 2014 नंतरची रुबलची सर्वोत्तम स्थिती ठरली आहे. रशियात अमेरिकी डॉलर व युरोची मागणी घटल्याने व त्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आणि त्यामुळे रुबल भक्कम झाल्याचा दावा विश्लेषकांनी केला आहे.

US dollar and euroफेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर रुबलची मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. मार्च महिन्यात एका अमेरिकी डॉलरसाठी तब्बल 150 युरो मोजणे भाग पडले होते. त्यानंतर रशियन चलन कोसळेल, असे भाकित अनेक पाश्चिमात्य तज्ज्ञ तसेच माध्यमांकडून करण्यात आले होते. मात्र रशियाच्या मध्यवर्ती बँकेने केलेल्या उपाययोजनांनंतर रुबलची स्थिती भक्कम बनली. यामागे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सुरू केलेली डी-डॉलरायझेशनची प्रक्रिया हे मुख्य कारण असल्याचे मानले जाते.

अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर रशियाने गेल्या दशकापासून अमेरिकी डॉलरचा वापर कमी करण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यानंतर पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांना शह देण्यासाठी रशियाकडून नवनव्या पर्यायांची चाचपणी चालू केली होती. त्यात सोन्याची वाढती खरेदी, इतर देशांबरोबरील व्यवहारात रुबलसह स्थानिक चलनांना प्राधान्य देणे यासह पर्यायी राखीव चलन व पर्यायी पेमेंट सिस्टिम अशा दोन्ही योजनांनाही वेग दिला होता.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ब्रिक्स देशांच्या बैठकीत रशियन राष्ट्राध्यक्षांनी सदर गट राखीव आंतरराष्ट्रीय चलन तसेच पर्यायी पेमेंट सिस्टिमवर काम करीत असल्याची उघड घोषणा केली होती. त्यानंतर रशियन यंत्रणानी भारत, इराण, तुर्की यासारख्या देशांबरोबर चलनाचा वापर तसेच व्यापारी व्यवहारांसंदर्भात करार होत असल्याचे संकेत दिले होते. गेल्या महिन्यात झालेल्या ‘युरेशियन इकॉनॉमिक युनियन’च्या बैठकीत, परस्परांमधील व्यापारी व्यवहारांमध्ये राष्ट्रीय चलनांचा वापर प्रस्तावित करण्यात येत आहे, असेही जाहीर करण्यात आले होते. यामुळे डॉलरच्या तुलनेत जगभरातील इतर प्रमुख देशांचे चलन घसरत असताना रशियन रुबल मात्र भक्कम स्थितीत असल्याचे दिसते.

leave a reply