कोरोनाची साथ असताना एलएसीवर भारताने चीनला दिलेले प्रत्युत्तर जगाने पाहिले

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

चेन्नई – कोरोनाची साथ आलेली असताना, एलएसीवरील आपल्या घुसखोरीला भारत कठोर प्रत्युत्तर देऊ शकणार नाही, असे चीनला वाटले होते. पण हा चीनचा भ्रम ठरला. कोरोनाची साथ असताना देखील भारतीय लष्कराने एलएसीमध्ये बदल करण्याचे चीनचे एकतर्फी प्रयत्न हाणून पाडले. भारतीय लष्कराने चीनला दिलेले कठोर प्रत्युत्तर साऱ्या जगाने पाहिले आहे. इतकेच नाही, तर गेल्या महिन्यात अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये भारतीय लष्कराने चीनच्या घुसखोरीवर कठोर कारवाई केली होती, अशा थेट शब्दात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चीनचे वाभाडे काढले आहेत. त्याचवेळी चीनचे डाव उधळून लावणाऱ्या भारतीय लष्कराची परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. आपल्या श्रीलंकेच्या दौऱ्याआधी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनवर केलेली टीका लक्षवेधी ठरते.

Corona epidemicचेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांनी चीनवर तोफ डागली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत आपले चीनबरोबरील संबंध सुरळीत नसल्याचे सांगत आहे. तर चीन मात्र भारताबरोबरील आपली सीमा शांत असल्याचे दावे करून एलएसीवरील तणावाकडून जगाचे लक्ष इतरत्र वळवू पाहत आहे. अशा स्थितीत गेल्या काही आठवड्यांपासून भारतीय नेते चीनच्या विरोधात अधिकाधिक आक्रमक भाषेचा प्रयोग करीत असून चीनला सज्जड इशारे देत आहेत. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आपल्या परराष्ट्र दौऱ्यांमध्ये चीनबरोबरील भारताचे संबंध ताणलेले असल्याचे सांगून आंतरराष्ट्रीय समुदायाला परिस्थितीची जाणीव करून दिली होती. तर चेन्नईमधील कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांनी चीनच्या डावपेचांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

सारे जग कोरोनाच्या साथीने ग्रासलेले असताना, भारतात देखील कोरोनाच्या साथीचा प्रभाव दिसू लागला होता. अशा काळात एलएसीवर अतिक्रमण केले तर भारत त्याला उत्तर देऊ शकणार नाही, असे चीनला वाटत होते. पण तसे झाले नाही. भारतीय लष्कराने चीनचा हा भ्रम दूर केला आणि चीनच्या घुसखोरीला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. याची दखल साऱ्या जगाने घेतली आणि भारताच्या विरोधात कुणीही आक्रमक कारवाई करू शकत नाही, हा संदेश साऱ्या जगाला मिळालेला आहे, असे जयशंकर म्हणाले. केवळ चीनबरोबरच्या एलएसीवरच नाही, तर भारत सागरी क्षेत्रातही वर्चस्व गाजवित असल्याचे सांगून यामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्व अधिकच वाढल्याचा दावा परराष्ट्रमंत्र्यांनी केला. हिंदी महासागर क्षेत्र पुढच्या काळात अत्यंत महत्त्वाचे ठरेल. अशा परिस्थितीत भारताला सहभागी करून घेतल्याखेरीज या क्षेत्रात कुठलाही उपक्रम यशस्वी होणे शक्यच नाही, असा निर्वाळा यावेळी जयशंकर यांनी दिला.

हिंदी महासागर क्षेत्राचे आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्व वाढत असताना, भारत याचा वापर आपल्या हितसंबंधांसाठी कशारितीने करतो, यावर पुढच्या काळातील भारताचे आंतरराष्ट्रीय स्थान अवलंबून असेल, असे विश्लेषकांचे लक्ष वेधून घेणारे विधान जयशंकर यांनी केले. या सागरी क्षेत्रावर ज्या प्रमाणात भारताचा प्रभाव व सहभाग वाढेल, त्याच प्रमाणात भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थान उंचावत जाईल, असे सांगून जयशंकर यांनी याचे महत्त्व अधोरेखित केले. दरम्यान, याआधीही परराष्ट्रमंत्र्यांनी हिंदी महासागर व पॅसेफिक महासागर अशी विभागणारी कुठलीही रेषा अस्तित्त्वात नसून मालवाहतुकीच्या दृष्टीकोनातून हे सारे एकच क्षेत्र ठरते, असे बजावले होते.

leave a reply