भारताच्या संरक्षण क्षेत्रावरील जगाचा विश्वास वाढला

पंतप्रधान नरेंद्र मोदी

India's defence sectorबंगळुरू – पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत बंगळुरूमध्ये ‘एरो इंडिया-2023’चा शुभारंभ झाला. हा आता केवळ एअर शो राहिलेला नाही, तर बदललेल्या भारताचे प्रतिबिंब यात पडल्याचे सांगून पंतप्रधानांनी जवळपास शंभर देश आणि 700 देशीविदेशी कंपन्या एरो इंडियामध्ये सहभागी झाल्या आहे. ही बाब संरक्षणक्षेत्रात भारतावरील जगाचा विश्वास वाढल्याचे दाखवून देत आहे. आता भारत केवळ संरक्षणक्षेत्राची बाजारपेठ असलेला देश राहिलेला नाही, तर संरक्षणक्षेत्रातील भागीदार देश म्हणून भारताकडे विश्वासाने पाहिले जात आहे, असा दावा पंतप्रधानांनी केला.

आकाशात गर्जना करणारे तेजस लढाऊ विमान आणि हिंदी महासागर क्षेत्रात वावरणारी ‘आयएनएस विक्रांत’ विमानवाहू युद्धनौका ‘मेक इन इंडिया’चे यश दाखवून देत आहे. गेल्या पाच वर्षात भारताची संरक्षणविषयक निर्यात दुपटीने वाढलेली आहे. जगभरातील 75 देशांना भारत संरक्षणविषयक साहित्याची निर्यात करीत आहे. सध्या 1.5 अब्ज डॉलर्सवर असलेली देशाची संरक्षणक्षेत्रातील निर्यात 2024-25 सालापर्यंत पाच अब्ज डॉलर्सवर नेण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

world's confidenceभारताने संरक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या सुधारणा घडवून आणल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान व संकल्पना यांना वाव मिळावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून संरक्षणसाहित्य व शस्त्रास्त्रांसाठी कारखाने उभे करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य पुरविण्यासाठी सरकार उत्सुक असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत एरो इंडिया भारतासाठी लाँच पॅडचे काम करीत असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. एकेकाळी संरक्षणसाहित्याची व शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा आयातदार असलेला भारत आत्ता संरक्षणसाहित्याची निर्मिती करणारा सर्वात मोठा देश बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

या आघाडीवर देशाचे खाजगी क्षेत्र आणि गुंतवणूकदार अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतील. म्हणूनच देशाच्या खाजगी क्षेत्राने संरक्षणाच्या क्षेत्रात शक्य तितकी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. खाजगी क्षेत्राची संरक्षणातील ही गुंतवणूक नव्या संधी व नवी दालने खुली केल्यावाचून राहणार नाही, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. जिथे मागणी असते, क्षमता व अनुभव असतो, तिथे उद्योग दिवसागणिक अधिकाधिक भरभराटीला येतो, हा नैसर्गिक सिद्धांत आहे. म्हणूनच भारताचे संरक्षणक्षेत्र पुढच्या काळात अधिकाधिक गतीमान होत राहिल, ही बाब पंतप्रधानांनी लक्षात आणून दिली.

याबरोबरच एरो इंडियामध्ये नव्या भारताच्या नव्या आकांक्षांचे प्रतिबिंब पडले आहे. आधीच्या काळात याकडे केवळ एअर शो म्हणून किंवा भारताला विक्री करण्यासाठी प्रदर्शनाचे माध्यम म्हणून पाहिले जात होते. पण आत्ताच्या काळात ही मानसिकता मागे पडली आहे. एरो इंडिया आता केवळ एअर शो राहिलेला नाही. भारताच्या सामर्थ्य प्रदर्शनाचे माध्यम तसेच भारताच्या संरक्षण उद्योगाची क्षमता सिद्ध करणारे व आत्मविश्वास दाखवून देणारे माध्यम म्हणून एरो इंडियाकडे पाहिले जात असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला.

leave a reply