पाकिस्तानात हिजबुल मुजाहिद्दीनचा तिसऱ्या क्रमांकाचा नेता ठार

- पाकिस्तानी माध्यमांचा भारताच्या गुप्तचर संघटनेवर आरोप

लाहोर – भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्या हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा तिसऱ्या क्रमांकाचा नेता ‘बशीर अहमद पीर’ उर्फ ‘इम्तियाज आलम’ पाकिस्तानात ठार झाला. सोमवारी रावळपिंडी येेथे झालेल्या गोळीबारात इम्तियाज आलम मारला गेल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हिजबुल मुजाहिद्दीनबरोबरच या दहशतवादी संघटनेच्या मागे असलेल्या पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. पाकिस्तानच्या या कुख्यात गुप्तचर संघटनेने तातडीने या हल्ल्याची चौकशी सुरू केली आहे. भारतात मात्र इम्तियाज आलम ठार झाल्याच्या बातमीचे स्वागत होत आहे.

जम्मू व काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडविणे तसेच भारताच्या विरोधात अपप्रचाराची ऑनलाईन मोहीम राबविणे आणि हिजबुल, ‘लश्कर-ए-तोयबा’ व इतर दहशतवादी संघटनांना एकत्र आणण्यात इम्तियाज आलम याचा हात होता. इतकेच नाही तर जम्मू व काश्मीरमध्ये कट्टरवादाचा पुरस्कार करून भारताच्या विरोधात द्वेष पसरविण्यासाठी त्याने आपली यंत्रणाच उभी केली होती. इतकेच नाही तर जम्मू व काश्मीरमध्ये घातपात माजविण्यासाठी इम्तियाज आलमने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे तळ सुरू केले होते. तो जम्मू व काश्मीरमध्ये घातपात घडविण्याची तयारी करीत असल्याचे दावे देखील करण्यात येत होते.

भारताने ‘मोस्ट वाँटेड’ घोषित केलेल्या दहशतवाद्यांमध्ये इम्तियाज आलमचा समावेश होता. जम्मू व काश्मीरमध्ये झालेल्या घातपातांचा सूत्रधार असलेल्या इम्तियाज आलमचा भारतीय सुरक्षा यंत्रणा कसून शोध घेत होत्या. मात्र तो पाकिस्तानच्या लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडी शहरात वावरत होता. सोमवारी रात्रीच्या सुमारास एका दुकानाच्या बाहेर उभ्या असलेल्या इम्तियाज आलमवर दोन अज्ञान हल्लेखोरांनी जवळून गोळ्या झाडल्या. यानंतर हे हल्लेखोर पसार झाले.

इम्तियाज आलम याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण तो आधीच दगावल्याचे उघड झाले. हिजबुल मुजाहिद्दीनचा तिसऱ्या क्रमांकाचा नेता अशारितीने ठार झाल्याने या दहशतवादी संघटनेला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. हिजबुल तसेच इतर दहशतवादी संघटनांची पाठराखण करून त्यांना सूचना देणारी पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ देखील इम्तियाज ठार झाल्याने हादरली आहे. या हल्ल्याची चौकशी आयएसआयने सुरू केल्याच्या बातम्याआल्या आहेत. पाकिस्तानातील वर्तमानपत्रांनी या हल्ल्यामागे भारताची गुप्तचर संघटना रॉ असल्याचा आरोप केला.

कंदाहर विमान अपहरण प्रकरणात सहभागी असलेला ‘जैश-ए-मोहम्मद’चा दहशतवादी जहूर मिस्त्री याला देखील अज्ञात मारेकऱ्यांनी ठार केले होते. त्यावेळीही पाकिस्तानच्या माध्यमांनी यामागे रॉ असल्याचा आरोप केला होता. तसेच मुंबईवर २६/११चा हल्ला घडविणारा हफीज सईद याच्या लाहोरमधील घराबाहेर झालेल्या स्फोटामागेही भारताच्या गुप्तचर संघटनेचे कारस्थान असल्याचे आरोप पाकिस्तानने केले होते. मात्र हे आरोप सिद्ध करणारा एकही पुरावा पाकिस्तानकडून आलेला नाही.

leave a reply