तालिबानला मान्यता न दिल्यास दुसऱ्या 9/11चा धोका

- पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची धमकी

लंडन – अमेरिकेने तालिबानला त्वरित मान्यता दिली नाही, तर दुसऱ्या 9/11चा धोका आहे, असा इशारा पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी दिला. ब्रिटनच्या वर्तमानपत्राला दिलेली ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर युसूफ यांनी आपल्या बोलण्याचा पूर्णपणे विपर्यास करण्यात आल्याची टीका केली आहे. पण याआधी एका ब्रिटीश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोईद युसूफ यांनी थोड्याफार वेगळ्या शब्दात हाच इशारा दिला होता. तसेच पाकिस्तानचे माहिती व प्रसारणमंत्री फवाद चौधरी यांनी देखील अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर पाकिस्तानच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यास भयंकर परिस्थिती उद्भवेल असे बजावले आहे.

‘पाकिस्तानचे म्हणणे विचारात घेतल्याखेरीज अफगाणिस्तानची समस्या सुटणे शक्यच नाही. पाकिस्तानकडे दुर्लक्ष करून कुणीही अफगाणिस्तानचा प्रश्‍न सोडवू शकत नाही’, असे इशारे पाकिस्तानच्या मंत्र्यांनी दिले होते. पण पाकिस्तानच्या या दाव्यांकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणीही फारसे लक्ष दिले नव्हते. यामुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने आता अधिक आक्रमकपणे ब्लॅकमेलिंग सुरू केल्याचे समोर येत आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी ‘द संडे टाईम्स’ या ब्रिटनच्या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिलेला इशारा हेच दाखवून देत आहे.

अमेरिकेने तालिबानला त्वरित मान्यता दिली नाही, तर दुसऱ्या 9/11 हल्ल्याचा धोका संभवतो, असे मोईद युसूफ यांनी म्हटल्याचा दावा या वर्तमानपत्राने केला. यावर युसूफ यांनी आक्षेप नोंदविला. आपल्या बोलण्याचा पूर्णपणे विपर्यास करण्यात आल्याचे युसूफ यांनी स्पष्ट केले. प्रत्यक्षात युसूफ यांनी 90 च्या दशकाप्रमाणेच यावेळीही पाश्‍चिमात्यांनी अफगाणिस्तानला वाऱ्यावर सोडून दिले, तर आधीच्या घटनांची पुनरावृत्ती होईल, असे म्हटले होते. 90 च्या दशकात अफगाणिस्तानातून सोव्हिएत रशियाने माघार घेतल्यानंतर, अमेरिकेने अफगाणिस्तानकडे पाठ फिरविली होती. त्यानंतर अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून अमेरिकेवर 9/11 हल्ल्याचा कट आखण्यात आला होता. या इतिहासाचा दाखल युसूफ यांनी आपल्या मुलाखतीत दिला होता.

असे असूनही मोईद युसूफ यांनी आपल्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र स्काय न्यूज या ब्रिटनच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही मोईद युसूफ थोड्याफार फरकाने अशाच धमक्या देत असल्याचे समोर आले होते. इतकेच नाही तर पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारमंत्री फवाद चौधरी यांनी देखील अफगाणिस्तानबाबत पाकिस्तान देत असलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले तर भयंकर परिस्थिती ओढावेल, असे बजावले आहे. अफगाणिस्तानातील लाखो निर्वासित पाकिस्तानात शिरत आहेत. त्यांचा स्वीकार करणे पाकिस्तानच्या कुवतीबाहेरची बाब ठरेल. आधीच पाकिस्तानात 35 लाख अफगाणी निर्वासित आहेत. अशा परिस्थितीत पाश्‍चिमात्यांनी अफगाणिस्तानातील परिस्थितीबाबत पाकिस्तानला सल्ला ऐकला नाही, भयावह परिस्थिती ओढावेल, असे फवाद चौधरी पुढे म्हणाले.

मोईद युसूफ व फवाद चौधरी यांची विधाने पाकिस्तानचे ब्लॅकमेलिंग व धमकीसत्र सुरू झाल्याचे संकेत देत आहेत. याची गंभीर दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतली आहे. पाश्‍चिमात्य देशांकडूनही यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ शकते.

leave a reply