सुदानमधील गृहयुद्धामुळे जैविक संकटाचा धोका वाढला

- जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

जीनिव्हा/खार्तूम – सुदानची राजधानी खार्तूममधील जैविक प्रयोगशाळेचा ताबा इथल्या संघर्षात उडी घेतलेल्या एका पक्षाने घेतला आहे. या प्रयोगशाळेत गोवर, कॉलरा, पोलिओ आणि इतर संसर्गजन्य विषाणूंवर संशोधन सुरू होते. पण सदर प्रयोगशाळा सशस्त्रदलांच्या ताब्यात गेल्यामुळे सुदानमध्ये जैविक संकटाचा धोका वाढला आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला. युक्रेनमधील जैविक प्रयोगशाळांचा मुद्दा अमेरिकेच्या सिनेटमध्ये गाजत असताना, सुदानमधील गृहयुद्धात देखील जैविक प्रयोगशाळेपासून संभवणारा धोका समोर आला आहे, याकडे अमेरिकेतील विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

सुदानमधील गृहयुद्धामुळे जैविक संकटाचा धोका वाढला - जागतिक आरोग्य संघटनेचा इशारासुदानमध्ये ७२ तासांची संघर्षबंदी लागू केल्यानंतर परदेशी नागरिकांना बाहेर काढण्याचा वेग वाढला आहे. कारण सुदानच्या लष्कराने संघर्षबंदीची घोषणा केली असली तरी राजधानी खार्तूमसह इतर भागात गोळीबार सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे या संघर्षबंदीला फारसा अर्थ उरलेला नसल्याची टीका पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत. कोणत्याही क्षणी सुदानमधील संघर्षाचा भडका उडू शकतो, याकडे ही माध्यमे लक्ष वेधत आहेत.

अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ अधिकारी निमा सईद अबिद यांनी व्हिडिओ लिंकद्वारे माध्यमांशी बोलताना एका गंभीर घटनेकडे लक्ष वेधले. राजधानी खार्तूममधील ‘नॅशनल पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी’ हल्लेखोर गटाने ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती निमा यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी किंवा निरिक्षकांनाही हल्लेखोरांनी प्रयोगशाळेत जाण्यास मनाई केली आहे. सदर प्रयोगशाळाच या हल्लेखोरांच्या ताब्यात गेल्याचे निमा म्हणाल्या.

सुदानमधील गृहयुद्धामुळे जैविक संकटाचा धोका वाढला - जागतिक आरोग्य संघटनेचा इशाराया प्रयोगशाळेत गोवर, कॉलरा, पोलिओ आणि इतर संसर्गजन्य विषाणूंवर संशोधन सुरू असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. पण हल्लेखोरांनी प्रयोगशाळांचा ताबा घेतल्यामुळे येथील विषाणूंचा गैरवापर होऊ शकतो किंवा मोठी आपत्ती उद्भवू शकते, याकडे आरोग्य संघटना लक्ष वेधत आहे. यामुळे जैविक संकटाचा धोका वाढल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला. पण त्यांनी सुदानमधील कुठल्या गटाने या प्रयोगशाळेचा ताबा घेतला, याचे तपशील देण्याचे टाळले.

गेल्या १२ दिवसांपासून सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दलात भडकलेल्या गृहयुद्धात ४५९ जणांचा बळी गेला असून ४,०७२ जण जखमी झाले आहेत. सुदानी नागरिकांबरोबरच आंतरराष्ट्रीय संघटनांच्या परदेशी कर्मचाऱ्यांचाही यात बळी गेला आहे. सुदानमध्ये संघर्ष भडकल्यानंतर पहिल्या ४८ तासातच संयुक्त राष्ट्रसंघाशी संलग्न असलेले सात कर्मचारी यात दगावले आहेत. त्याचबरोबर वर्ल्ड फूड प्रोग्राम, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या गटांनी सुदानमधील आपली सेवा बंद केली आहे. सुदानमधील गृहयुद्धामुळे जैविक संकटाचा धोका वाढला - जागतिक आरोग्य संघटनेचा इशाराया संघर्षामुळे सुदानमधील गरजूंपर्यंत आपली मदत पोहोचत नसल्याची चिंता संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेने व्यक्त केली.

या संघर्षामुळे लाखो सुदानी विस्थापित शेजारी आफ्रिकी देशांमध्ये आश्रय घेत आहेत. तर सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांची स्थिती बिकट बनली आहे. संघर्षबंदीनंतरही सुरू असलेल्या गोळीबारामुळे सुदानच्या सरकारने नागरिकांना इमारत न सोडण्याचे आदेश दिले आहे. त्यातच पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून काही ठिकाणी सुदानी जनतेवर नाईल नदीतील पाणी पिण्याची वेळ ओढावली आहे.

दरम्यान, सुदानमधील संघर्ष वेळीच रोखला नाही तर याचे परिणाम केवळ सुदान किंवा आफ्रिकेपर्यंत मर्यादित राहणार नाहीत, असा इशारा लष्करी विश्लेषकांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. सुदानमधील प्रयोगशाळांचा सशस्त्र दलांनी ताबा घेतल्याने हा इशारा अधिक गंभीर ठरत आहे.

leave a reply