भारत व आशियाई देशांना चीनच्या कम्युनिस्ट पार्टीपासून धोका

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

वॉशिंग्टन – ‘भारतासह आग्नेय आशियातील प्रमुख देशांना चीनच्या कम्युनिस्ट पार्टीकडून सुरू असलेल्या कारवायांचा धोका आहे. हा धोका वर्तमानकाळात अमेरिकेसमोर असलेले सर्वात मोठे आव्हान आहे. त्यासाठीच अमेरिका आपल्या सामरिक तैनातीच्या धोरणात बदल करीत असून आशियातील संरक्षणसज्जतेवर भर देत आहे’, अशा शब्दात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी पुन्हा एकदा चीनबरोबरीत वाढत्या संघर्षाची जाणीव करून दिली. त्याचवेळी या अमेरिका-चीन संघर्षाचा केंद्रबिंदू आशिया असेल असे संकेतही दिले.

America-Chinaगेल्या काही महिन्यात अमेरिकेने चीनविरोधात छेडलेल्या राजनैतिक संघर्षाला अधिकच धार आल्याचे दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व प्रशासनातील इतर प्रमुख नेत्यांकडून चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीला सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. कोरोनाची साथ हे प्रमुख कारण ठरले असले तरी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे वर्चस्ववादी धोरण व त्यानुसार सुरू असलेल्या कारवायांचा पर्दाफाश करण्यासाठी अमेरिकी नेतृत्व पुढे सरसावल्याचे दिसत आहे.

परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यात आघाडीवर असून गेले काही महिने ते सातत्याने चीनच्या कम्युनिस्ट पार्टीवर एकामागोमाग एक प्रहार करीत आहेत. ‘ब्रुसेल्स फोरम कॉन्फरन्स’ मध्ये त्याची पुनरावृत्ती करताना परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या कारवायांचा सर्वाधिक धोका भारत व आग्नेय आशियाई देशांना असल्याची जाणीव करून दिली. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) चिथावणीखोर मोहिमाही त्याचाच भाग असून भारतीय सीमेवर झालेला भीषण संघर्ष त्याचाच भाग असल्याचे अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले. यावेळी पॉम्पिओ यांनी चीनच्या ‘पीएलए’कडून साऊथ चायना सीमध्ये सुरु असलेल्या आक्रमक कारवाया व शेजारी देशांना सातत्याने देण्यात धमक्या याकडेही लक्ष वेधले.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारतावरील हल्लाप्रकरणी चीनची खरडपट्टी काढली होती. ‘चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताबरोबर जाणूनबुजून सीमेवर तणाव निर्माण केला’, असा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी केला होता. त्याचवेळी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यानी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीचा उल्लेख थेट ‘बदमाश’ असा करून खळबळ उडविली होती.

India-China‘ब्रुसेल्स फोरम’मध्ये चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी आणि पीपल्स लिबरेशन आर्मीकडून असलेल्या धोक्यांचा उल्लेख करून अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सामरिक तैनातीबाबत बदललेल्या भूमिकेचे समर्थन केले. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या कारवाया हे आजच्या अमेरिकेसमोरील सर्वात मोठे आव्हान असून त्याचा मुकाबला करण्यासाठीच आशियातील संरक्षणतैनाती मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येत असल्याचे पॉम्पिओ यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी, आता कुठे अमेरिकेला चीनच्या कम्युनिस्ट पार्टीकडून असलेल्या धोक्याची जाणीव झाल्याची कबुली दिली होती. त्यापाठोपाठ परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी कम्युनिस्ट पार्टी व ‘पीएलए’ सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगून त्याच्या मुकाबल्यासाठी अमेरिकेने उघड तयारी सुरू केल्याचे सांगणे महत्त्वाचे ठरते.

दरम्यान, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीविरोधात उघड भूमिका घेणाऱ्या अमेरिकेने आता या पार्टीवर थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. हॉंगकॉंगची स्वायत्तता हिरावून घेण्यास कारणीभूत असणाऱ्या कम्युनिस्ट पार्टीच्या विद्यमान तसेच माजी अधिकाऱ्यांना यापुढे अमेरिकेचा व्हिसा मिळणार नाही, अशी घोषणा परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केली. हॉंगकॉंग सुरक्षा कायद्याच्या मुद्द्यावरून चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई होण्याची या आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या सिनेटने कम्युनिस्ट पार्टीच्या अधिकार्‍यांवर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली होती.

गेल्या काही महिन्यात अमेरिकेकडून चीननजिकच्या क्षेत्रात वाढलेल्या लष्करी हालचाली व परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने त्याला उघडपणे दिलेला दुजोरा, या गोष्टी अमेरिकेने चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधातील संघर्षाला अधिक वेग दिल्याचे दाखवून देणाऱ्या ठरतात. या पार्श्वभूमीवर अमेरिका व चीनमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडेल, अशी चर्चा जागतिक प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाली आहे.

leave a reply