भारतीय लष्कराच्या समर्थनार्थ भारतातील तिबेटींची रॅली

रॅलीमसूरी – ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत तिबेटी तरुणांनी सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय जवानांच्या समर्थनार्थ बाईक रॅली काढली. मसुरीतून काढलेल्या या रॅलीत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणीही करण्यात आली. मसुरीबरोबरच डलहौसीमधील तिबेटी गटांनीही भारतीय लष्कराच्या समर्थनार्थ रॅली आयोजित केल्याचे समोर आले. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त या रॅलींचे आयोजन करण्यात आले होते.

‘इंडिया तिबेट कोऑपरेशन फोरम’, ‘रिजनल तिबेटन युथ कमिटी’ व ‘रिजनल तिबेटन युथ काँग्रेस’ या गटांच्या वतीने रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय लष्कराप्रती असणारा आदर व्यक्त करणे हा रॅलीचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर तिबेटमधील चीनच्या अत्याचारी धोरणांना विरोध व भारतीय जनतेने चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासाठी जनजागृती हा देखील रॅलीचा हेतू असल्याचा दावा रॅलीत सहभागी झालेल्या तिबेटी तरूणांनी केला. जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाच्या साथीसाठी चीनच जबाबदार असून, या मुद्याकडे लक्ष वेधणे हेदेखील रॅलीचे उद्दिष्ट असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

रॅली

काही महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील संघर्षात तिबेटींचा समावेश असलेल्या ‘स्पेशल फ्रंटिअर्स फोर्स’मधील (एसएफएफ) कमांडो निमा तेंझिन यांनी बलिदान दिले होते. तिबेटी वंशाच्या जवानाच्या या बलिदानाची भारताने विशेष दखल घेतली होती. भारताने चीनला दिलेला दणका व त्यात तिबेटी तरुणाचे बलिदान ही बाब भारतासह जगभरातील तिबेटींना प्रेरणा देणारी ठरली आहे. त्यातून तिबेटी जनतेच्या चीनविरोधी आंदोलनालाही नवे बळ मिळाले असून भारतीय जनतेकडूनही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

त्याचवेळी अमेरिका, कॅनडा, ब्रिटनसह युरोपिय देश तसेच ऑस्ट्रेलिया, जपान या देशांमध्ये चीनविरोधात होणाऱ्या निदर्शनांमध्ये तिबेटी नागरिकांचा सहभाग वाढताना दिसत आहे. त्यामुळे तिबेटचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यात स्वतंत्र तिबेटची मागणीही जोर धरू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी भारतातील निर्वासित तिबेटिअन सरकारचे प्रमुख डॉ. लॉबसांग सांगेय यांनी चीनबरोबरील सीमेचा उल्लेख आता भारत-तिबेट सीमा असा करायला हवा, असे आवाहन केले होते.

leave a reply