चलनाची घसरण व आर्थिक संकट बळावल्याने तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी जनतेचा विश्‍वास गमावला

जनतेचा विश्‍वास

इस्तंबूल – राष्ट्राध्यक्ष एर्दोगन तुर्कीला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकत नाहीत, असे असा निष्कर्ष तुर्कीतील बहुसंख्य जनतेला वाटत आहे. असे मानणार्‍यांचे प्रमाण सुमारे ६४ टक्के इतके असल्याचे नुकतेच एका पाहणीतून स्पष्ट झाले. तुर्कीचे चलन लिराची घसरण विक्रमी स्तरावर पोहोचली असून महागाईमुळे जनता हैराण झाली आहे. यामुळे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्यावरील तुर्कीच्या जनतेचा विश्‍वास उडत चालला असून त्याचे राजकीय परिणाम देखील समोर येऊ लागले आहेत.

तुर्कीचे चलन ‘लिरा’चे मुल्य डॉलरच्या तुलनेत विक्रमी स्तरावर घसरले आहे. एका डॉलरमागे ११ लिरा मोजावे लागत असून ही या वर्षातील सर्वात मोठी घसरण ठरते. याचा थेट परिणाम तुर्कीच्या चलनफुगवट्यावर होत आहे. ऑक्टोबर महिन्यात तुर्कीतील महागाईचा निर्देशांक २० टक्क्यांपर्यंत पोहोचला. तुर्कीच्या जनतेला यामुळे मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतलेल्या पाहणीतून समोर येत आहे.

त्यातच राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालल्याच्या बातम्या येत आहेत. पण एर्दोगन आपले पद सोडण्यासाठी तयार नाहीत. गेल्या दोन वर्षात राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी सेंट्रल बँकेच्या तीन गव्हर्नर्सची तडकाफडकी बदली केली. आपल्या आदेशांचे पालन करण्यास नकार दिल्यामुळे एर्दोगन यांनी ही कारवाई केली. यामुळे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याविरोधातील नाराजी वाढत चालली असून देशावरील आर्थिक संकटासाठी एर्दोगनच जबाबदार असल्याची टीका होत आहे.

एर्दोगन यांचे नेतृत्व तुर्कीला आर्थिक संकटात बाहेर काढू शकत नसल्याचे तुर्कीतील ६४ टक्के जनतेला वाटत आहे. याआधी फेब्रुवारी आणि सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत तुर्कीच्या जनतेचा एर्दोगन यांच्यावरील अविश्‍वास वाढल्याचे नुकत्याच समोर आलेल्या पाहणीतून समोर आले आहे.

एर्दोगन यांच्या चुकीच्या निर्णयामुळे आपल्या देशाला ‘फायनॅन्शियल ऍक्शन टास्क फोर्स-एफएटीएफ’ने ग्रे लिस्टमध्ये टाकल्याची नाराजीही तुर्कीची जनता व्यक्त करीत आहे. तुर्कीच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा एर्दोगन यांनी आपल्या देशाला सिरिया, लिबिया, आर्मेनिया-अझरबैजान यांच्यातील संघर्षात गुंतवले. त्याचबरोबर अमेरिका, फ्रान्स, इस्रायल, ग्रसि, सायप्रस, रशिया आणि इजिप्त या देशांबरोबर संबंध बिघडविल्याची टीका तुर्कीतून होत आहे.

याउलट तुर्कीचे माजी पंतप्रधान व विरोधी पक्षनेते अहमत दावुसोग्लू यांना तुर्कीच्या जनतेचा पाठिंबा मिळत आहे. एर्दोगन यांच्या ‘जस्टिस अँड डेव्हलपमेंट-एकेपी’ पक्षाविरोधात सहा विरोधी पक्ष एकत्र आले असून एर्दोगन यांनी राजीनामा देण्याची मागणी करीत आहेत. पण २०२३ सालच्या निवडणुकीपर्यंत एर्दोगन सत्ता सोडणार नसल्याची चिंता तुर्कीची जनता व्यक्त करीत आहेत.

leave a reply