युक्रेनला एस-४०० पुरविण्याच्या मोबदल्यात तुर्कीची अमेरिकेकडे एफ-३५, पॅट्रियॉटची मागणी

एफ-३५अंकारा – रशियाचे हवाई हल्ले रोखण्यासाठी युक्रेनला ‘एस-४००’ हवाई सुरक्षा यंत्रणा पुरवावी, असे पाश्‍चिमात्य देशांना वाटत असेल तर त्याआधी तुर्कीची मागणी बिनशर्त मान्य करावी लागेल. सर्वात आधी अमेरिकेने तुर्कीला एफ-३५ अतिप्रगत लढाऊ विमाने आणि पॅट्रियॉट क्षेपणास्त्र यंत्रणा पुरवावी, अशी मागणी तुर्कीने केली आहे. त्याचबरोबर तुर्कीबरोबरचे संबंध सुधारण्याची सर्वस्वी जबाबदारी पाश्‍चिमात्यांवर असल्याचा इशारा तुर्कीने दिला. रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर नाटोने आयोजित केलेल्या बैठकीआधी तुर्कीने अमेरिकेसमोर ही मागणी केली.

गुरुवारी ब्रुसेल्स येथे नाटोची तातडीची बैठक पार पडली. या निमित्ताने तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी रशिया-युक्रेनमधील युद्ध रोखण्यासाठी वाटाघाटींची आवश्यकता असल्याचे आवाहन केले. तसेच युरोपिय देशांनी तुर्कीच्या सदस्यत्वाबाबत नव्याने विचार करावा, अशी आठवणही एर्दोगन यांनी करून दिली.

या बैठकीआधी राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचे वरिष्ठ सल्लागार फहरेत्तीन अल्तून यांनी अमेरिकी दैनिकासाठी लिहिलेल्या लेखात तुर्कीच्या मागण्यांचा उल्लेख केला. पाश्‍चिमात्य देशांनी तुर्कीला त्यांच्यापैकी एक म्हणून वागवावे, धोरणात्मक सहकारी म्हणून तुर्कीला युरोपिय महासंघात सामील करावे, असे अल्तून यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी अमेरिकेने तुर्कीला केलेल्या सूचनेबाबतही राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या सल्लागारांनी आपल्या देशाची भूमिका मांडली.
‘पाश्‍चिमात्य देशांनी कोणत्याही अटीशिवाय तुर्कीला एफ-३५ लढाऊ विमाने आणि पॅट्रियॉट यंत्रणा रवाना करावी’, असे अल्तून यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. पण अमेरिकेकडून मिळणार्‍या या लष्करी सहकार्याच्या मोबदल्यात तुर्की युक्रेनला एस-४०० पुरविणार का, हे अल्तून यांनी स्पष्ट केलेले नाही. अमेरिकेच्या मागणीप्रमाणे तुर्की युक्रेनला हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविल, पण एस-४०० पुरविणे शक्य नाही, असे अल्तून यांनी सांगितले.

एफ-३५गेल्या महिन्यात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या उपमंत्री वेंडी शर्मन यांनी तुर्कीचा विशेष दौरा केला होता. यात अमेरिकेच्या शर्मन यांनी तुर्कीसमोर युक्रेनला लष्करी सहाय्य पुरविण्याचा प्रस्ताव मांडला. युक्रेनच्या बचावासाठी तुर्कीने रशियाकडून खरेदी केलेली एस-४०० ही हवाई सुरक्षा यंत्रणा पुरवावी, असे शर्मन यांनी सुचविले होते.

रशियाकडून शस्त्रखरेदी करणार्‍या देशांनी या युद्धकाळात युक्रेनला सदर शस्त्रसाठा पुरवावा, असे आवाहन बायडेन प्रशासन करीत आहे. प्रामुख्याने एस-३०० व एस-४०० या हवाई सुरक्षा यंत्रणा रशियाविरोधी युद्धात युक्रेनच्या लष्करासाठी सहाय्यक ठरतील, असे बायडेन प्रशासनाचे म्हणणे होते. यावर तुर्कीची प्रतिक्रिया अपेक्षित होती.

नाटोचा सदस्य देश म्हणून अमेरिकेची ही सूचना मान्य करणे तुर्कीसाठी बंधनकारक ठरते. पण युक्रेनला एस-४०० किंवा कुठल्याही स्वरूपाचे लष्करी सहाय्य पुरविल्यास त्याचा थेट परिणाम रशियाबरोबरील संबंधांवर होऊ शकतो, याची तुर्कीला पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे तुर्कीने अमेरिकेकडून एफ-३५ व पॅट्रियॉटची मागणी केली असली तरी युक्रेनला एस-४०० पुरविण्याबाबत स्पष्ट भूमिका स्वीकारलेली नाही.

leave a reply