तुर्कीने इस्रायली व्यावसायिकाच्या हत्येचा इराणचा कट उधळला

इराणचा कटअंकारा – तुर्कीस्थित इस्रायली व्यावसायिकाची हत्या घडविण्याचा इराणने आखलेला कट तुर्कीच्या गुप्तचर यंत्रणेने उधळला. याप्रकरणी तुर्कीने आठ जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये तुर्की तसेच इराणी नागरिकांचा देखील समावेश आहे. तुर्की आणि इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांनी एकत्र येऊन ही कारवाई केली.

तुर्कीतील एर्दोगन सरकारसंलग्न दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ‘येर गेलर’ या व्यावसायिकाच्या हत्येची तयारी हल्लेखोरांनी केली होती. गेले दोन महिने इराणी वंशाचा ‘एसएमबी’ गेलरच्या हत्येचे नेटवर्क हाताळत होता. या नेटवर्कमध्ये अधिकांश तुर्कीचे तर काही प्रमाणात इराणी वंशाचे नागरिक होते. तुर्कीच्या राष्ट्रीय गुप्तचर संघटना ‘एमआयटी’चे एजंट या नेटवर्कवर पाळत ठेवून होते.

इराणच्या हल्लेखोरांनी गेलर यांच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून त्यांच्या हत्येची तयारी सुरू केली होती. हे लक्षात येताच एमआयटीने इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’शी संपर्क साधून गेलरला सुरक्षित ठिकाणी हलविले. त्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये तुर्कीच्या गुप्तचर यंत्रणेने वेगवेगळ्या भागात कारवाई करून या नेटवर्कच्या आठ जणांना ताब्यात घेतले. तर इराणशी संबंधित एक हल्लेखोर फरार असल्याची माहिती तुर्कीच्या गुप्तचर यंत्रणेने दिली.

आर्थिक संकटात सापडलेला तुर्की इस्रायल तसेच अरब देशांबरोबर संबंध सुधारण्याला महत्त्व देत आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्‍यांची स्वतंत्र बैठकही पार पडल्याचे बोलले जाते.

leave a reply