रशियाविरोधी संघर्षात तुर्कीने युक्रेनला एस-४०० पुरवावी

- अमेरिकेची सूचना

वॉशिंग्टन – रशियाचे युक्रेनवरील हवाई हल्ले रोखण्यासाठी तुर्कीने युक्रेनला एस-४०० ही हवाई सुरक्षा यंत्रणा पुरवावी, अशी सूचना बायडेन प्रशासनाने तुर्कीला केली. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने अमेरिका तसेच तुर्कीतील तीन सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती उघड केली. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या उपमंत्री वेंडी शर्मन यांनी तुर्कीच्या दौर्‍यात हा मुद्दा उपस्थित केला होता. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर तुर्कीने याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

गेल्या महिन्यात वेंडी शर्मन यांनी तुर्कीचा विशेष दौरा केला होता. यात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या उपमंत्र्यांनी तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ सदस्याची भेट घेतली होती. या चर्चेत शर्मन यांनी तुर्कीसमोर युक्रेनला लष्करी सहाय्य पुरविण्याचा प्रस्ताव मांडला. येत्या काळात रशियाने युक्रेनवर हल्ले चढविल्यास, युक्रेनच्या बचावासाठी तुर्कीने आपल्याकडील एस-४०० ही हवाई सुरक्षा यंत्रणा पुरवावी, असे शर्मन यांनी सुचविले होते.

अमेरिकेतील लष्करी विश्‍लेषक देखील तुर्कीला नेमके हेच सुचवित आहेत. २०१९ साली तुर्कीने अमेरिका व नाटोची नाराजी पत्करून रशियाकडून एस-४००ची खरेदी केली. यासाठी तुर्कीने अमेरिकेकडून मिळणार्‍या एफ-३५ या अतिप्रगत लढाऊ विमानांच्या खरेदीकडेही पाठ फिरविली होती. तुर्कीला ही विमाने हवी असल्यास राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या सरकारने युक्रेनला एस-४०० पुरवावी, असे अमेरिकेचे लष्करी विश्‍लेषक सुचवित आहेत.

रशियाकडून शस्त्रखरेदी करणार्‍या देशांनी या युद्धकाळात युक्रेनला सदर शस्त्रसाठा पुरवावा, असे आवाहन बायडेन प्रशासन करीत आहे. प्रामुख्याने एस-३०० व एस-४०० या हवाई सुरक्षा यंत्रणा रशियाविरोधी युद्धात युक्रेनच्या लष्करासाठी सहाय्यक ठरतील, असे बायडेन प्रशासनाचे म्हणणे आहे. यानुसार पोलंडने आपल्या हवाईदलातील मिग लढाऊ विमाने युक्रेनला पुरविण्याची घोषणा केली होती. पण त्यामोबदल्यात अमेरिकेने आपल्याला एफ-३५ ही अतिप्रगत लढाऊ विमाने पुरवावी, अशी मागणी पोलंडने केली होती. बायडेन प्रशासनाने पोलंडची ही मागणी धुडकावली होती.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. पण यावर तुर्कीने नेमका काय प्रतिसाद दिला, हे या वृत्तसंस्थेने स्पष्ट केले नाही. नाटोचा सदस्य देश म्हणून अमेरिकेची ही सूचना मान्य करणे तुर्कीसाठी बंधनकारक ठरते. पण युक्रेनला एस-४०० किंवा कुठल्याही स्वरूपाचे लष्करी सहाय्य पुरविल्यास त्याचा थेट परिणाम तुर्की व रशियातील संबंधांवर होऊ शकतो, याकडे या वृत्तसंस्थेने लक्ष वेधले.

leave a reply