इंधनवायूचे उत्खनन करणाऱ्या सायप्रसला तुर्कीचा इशारा

इंधनवायूचे उत्खननअंकारा – रशिया-युक्रेनमध्ये युद्ध भडकलेले असताना, तुर्कीने भूमध्य समुद्रातील आपल्या हालचाली तीव्र केल्या आहेत. सायप्रसने आपल्याच सागरी क्षेत्रात सुरू केलेल्या इंधनवायूच्या उत्खननावर तुर्कीने आक्षेप घेतला. सायप्रसने या क्षेत्रातील इंधनवायूचे उत्खनन त्वरीत बंद केले नाही, तर त्याविरोधात मोठी कारवाई केली जाईल, असा इशारा तुर्कीने दिला होता. सायप्रसमधील इंधन क्षेत्राच्या उत्खननासाठी फ्रान्स व इटलीच्या कंपन्यांनी उत्सूकता व्यक्त केली होती.

इंधनवायूचे उत्खनन१९७४ साली तुर्कीने हल्ले चढवून सायप्रसचे विभाजन केले होते. यापैकी सायप्रसच्या उत्तरेकडील भूभागावर तुर्कीचे नियंत्रण आहे. तर सायप्रस या देशाला संयुक्त राष्ट्रसंघासह बहुतांश देशांनी मान्यता दिली आहे. तरी देखील सायप्रसचे सार्वभौमत्व आपल्याला मान्य नसल्याचे तुर्कीने वारंवार बजावले आहे. त्यामुळे सायप्रस या क्षेत्रात करीत असलेल्या कारवाईवर तुर्कीकडून दरवेळी भडक प्रतिक्रिया येते. काही आठवड्यांपूर्वी फ्रान्सच्या टोटल एनर्जीज्‌‍ आणि इटलीच्या एनी या इंधन क्षेत्रातील दोन बड्या कंपन्यांना सायप्रसच्या ‘विशेष आर्थिक सागरी क्षेत्रात’ मोठ्या प्रमणात नैसर्गिक इंधनवायूचा साठा असल्याचे आढळले. सायप्रसच्या ऊर्र्जामंत्र्यांनी ही माहिती दिली. त्यानंतर सायप्रसने फ्रेंच व इटालियन कंपन्यांना संबंधित क्षेत्रात उत्खनन करण्याची परवानगी दिली होती. यामुळे सायप्रसला आर्थिक तसेच राजकीय स्तरावर मोठा फायदा मिळणार होता.

पण त्याआधीच तुर्कीने या इंधनवायूच्या उत्खननाला विरोध केला आहे. सदर सागरी क्षेत्र उत्तर सायप्रसच्या अखत्यारीत असून ग्रीसने बसविलेल्या सायप्रसच्या सरकारला आपली मान्यता नसल्याचे तुर्कीने म्हटले आहे. त्यामुळे सायप्रसने उत्तरेकडील भागात उत्खननासाठी दिलेली परवानगी कुठल्याही प्रकारे कायद्याला धरुन नसल्याचा आरोप तुर्कीने केला आहे. यानंतरही तुर्की व इतर कंपन्यानी या क्षेत्रातील इंधनवाहूची निर्मिती सुरू ठेवली तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी धमकी तुर्कीने दिली आहे.

leave a reply