तुर्कीची क्षेपणास्त्रे ग्रीसची राजधानी अथेन्सवर मारा करु शकतात

- तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची धमकी

क्षेपणास्त्रेइस्तंबूल/अथेन्स – ‘आता तुर्कीने स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्यास सुरुवात केली आहे. या क्षेपणास्त्रांमुळे ग्रीसमध्ये भीतीचे वातावरण तयार झाल्याचे दिसते. टायफून हा शब्द उच्चारला ग्रीक जनता घाबरते व हे क्षेपणास्त्र अथेन्सवर सुद्धा पडू शकते अशी चिंता व्यक्त करते. ही गोष्ट खरी आहे, कारण टायफून क्षेपणास्त्र अथेन्सलादेखील लक्ष्य करु शकते’, अशी धमकी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी दिली. तुर्की राष्ट्राध्यक्षांच्या या धमकीवर ग्रीसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. उत्तर कोरियाप्रमाणे वृत्ती दाखविणाऱ्यांना नाटोत थारा नाही, असा टोला ग्रीसचे परराष्ट्रमंत्री निकोस डेन्डिआस यांनी लगावला आहे.

क्षेपणास्त्रेतुर्की व ग्रीसमध्ये गेल्या काही वर्षांपासून ‘एजिअन’ सागरी क्षेत्रातील बेटे व इंधनक्षेत्राच्या अधिकारांवरून असलेला तणाव चांगलाच चिघळला आहे. तुर्कीने एजिअन सागरी क्षेत्रातील ग्रीसच्या हद्दीत इंधनक्षेत्राचे संशोधन तसेच उत्खननासाठी जहाजे पाठविली होती. त्यापाठोपाठ आपल्या संरक्षणसामर्थ्याचे प्रदर्शन करण्यासाठी विनाशिकाही पाठविल्या होत्या. तुर्कीच्या नजिक असलेल्या ग्रीक बेटांवरील लष्कर मागे घेऊन ग्रीसने त्यावरील हक्क सोडून द्यावा, अशी आक्रमक मागणी तुर्कीच्या राजवटीकडून करण्यात आली होती.

तुर्कीच्या या आक्रमकतेला प्र्रत्युत्तर देण्यासाठी ग्रीसनेही आपल्या संरक्षणसज्जतेत वाढ करण्यासाठी पावले उचलली होती. त्याचवेळी आखात, आफ्रिका तसेच युरोपातील देशांबरोबर संरक्षण सहकार्य मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तुर्की अधिकच भडकला असून ग्रीसला उघड धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी युरोपिय महासंघ व नाटोकडून झालेली मध्यस्थी तात्पुरती राहिली असून तुर्कीच्या आक्रमकतेत अजूनही बदल झालेला नाही. राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांची नवी धमकी त्याचाच भाग ठरते.

क्षेपणास्त्रेजर ग्रीसने शांतता न बाळगता अमेरिकेपासून ते इतर देशांपर्यंतचे सहकार्य घेऊन आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न केलाच तर तुर्की केवळ बघ्याची भूमिका घेणार नाही. तुर्कीला काहीतरी कारवाई करावीच लागेल’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी ग्रीसला धमकावले. तुर्कीने ‘टायफून’ नावाचे स्वदेशी बनावटीचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकसित केले असून ऑक्टोबर महिन्यात त्याच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या. या क्षेपणास्त्राचा पल्ला 560 किलोमीटर्स इतका आहे. तुर्कीकडे सध्या असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांमध्ये हे सर्वाधिक पल्ल्याचे क्षेपणास्त्र ठरले आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला वाढविता येईल, असा दावाही तुर्कीकडून करण्यात आला.

तुर्कीच्या या धमकीवर ग्रीसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. ग्रीसच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तुर्कीची तुलना वारंवार युद्धाच्या धमक्या देणाऱ्या उत्तर कोरियाच्या राजवटीशी केली आहे. अशा प्रकारची वृत्ती असलेल्यांना नाटोसारख्या गटात थारा नसल्याचे ग्रीक परराष्ट्रमंत्री डेन्डिआस यांनी बजावले. नाटोचा सदस्य असलेल्या देशाने ग्रीससारख्या नाटो देशाला क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकी देणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही ग्रीसच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.

leave a reply