अमेरिकी डॉलर जागतिक चलन म्हणून असलेले स्थान लवकरच गमावेल

- ‘लेहमन ब्रदर्स’च्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिकी डॉलरचे मूल्य सध्या सर्वोच्च पातळीवर दिसत असले तरी नजिकच्या काळात डॉलर जागतिक स्तरावरील राखीव चलन म्हणून असलेले स्थान गमावेल, असा इशारा ‘लेहमन ब्रदर्स’चे माजी वरिष्ठ अधिकारी लॉरेन्स मॅक्‌‍डोनाल्ड यांनी दिला. जागतिक स्तरावर वापरण्यात येणाऱ्या ‘स्विफ्ट’ या यंत्रणेचा शस्त्रासारखा होणारा वापर डॉलरचे वर्चस्व संपविणारा ठरत आहे, असेही मॅक्‌‍डोनाल्ड यांनी यावेळी बजावले. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकी डॉलर अधिकाधिक भक्कम होत असून त्याचा परिणाम जगातील इतर अर्थव्यवस्थांवर होत आहे. त्यामुळे अनेक देशांनी स्थानिक चलनांसह इतर पर्यायी चलनांचा वापर करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही याकडे लक्ष वेधले होते.

‘अमेरिकी डॉलर पुढील काळात आपले आघाडीचे स्थान गमावणार आहे. कदाचित ही गोष्ट लगेच घडणार नाही. अमेरिकेकडे असलेली प्रचंड संपत्ती, लष्करी सामर्थ्य यामुळे डॉलरची अखेर होण्यास कदाचित २० ते ३० वर्षेही लागू शकतील. पण राखीव चलन म्हणून डॉलर संपेल यात शंका नाही. डॉलर सध्या आपल्या सर्वोच्च स्तरावर आहे’, याकडे लॉरेन्स मॅक्‌‍डोनाल्ड यांनी लक्ष वेधले.

‘पाश्चिमात्य देश दर दहा वर्षांनी निर्बंध व स्विफ्टचा वापर करण्याचा खेळ खेळत आहेत. आता हा खेळ अनेक देशांविरोधात सुरू झाला आहे. युद्धाच्या काळात रशियावर लादलेले निर्बंध समजू शकतात. पण एकाच वेळेस तुम्ही दहा देशांवर निर्बंध लादण्याने समस्या गंभीर होते. निर्बंध लादलेल्या देशांना अमेरिकेविरोधात आघाडी तयार करण्याची संधी मिळते. सध्या हेच घडत आहे’, असेही लेहमन ब्रदर्सच्या माजी अधिकाऱ्यांनी बजावले. पुढील दोन वर्षात अमेरिकी डॉलरची मोठी घसरण झालेली असेल, असे भाकितही लॉरेन्स मॅक्‌‍डोनाल्ड यांनी वर्तविले आहे.

गेल्या वर्षी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, अमेरिकाच डॉलरचे राखीव चलन म्हणून असलेले महत्त्व संपवून टाकत आहे, असा आरोप केला होता. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व मित्रदेशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध टाकले. यात ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय यंत्रणेचा वापर करण्यावरील बंदीचाही समावेश होता. त्याला पर्याय म्हणून रशियाने रुबल चलनासह इतर आघाडीच्या चलनांचा वापर करण्याचा प्रस्ताव दिला होता. रशियाबरोबर व्यापार करणाऱ्या प्रमुख देशांनी सदर प्रस्ताव स्वीकारून त्याची अंमलबजावणीही सुरू केली होती.

त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व अमेरिकेतील अभ्यासगटांनी अमेरिकी डॉलरबाबत गंभीर इशारा दिला होता. आंतरराष्ट्रीय व्यवहारांशी निगडीत व्यवस्थेत उलथापालथी होत असून काही देश परकीय गंगाजळीतील डॉलरचा हिस्सा कमी करण्याबाबत विचार करीत असल्याचे नाणेनिधीच्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञांनी बजावले होते. तर जगातील काही मध्यवर्ती बँका अमेरिकी डॉलरवर असलेले अवलंबित्व योग्य आहे याबाबत फेरविचार करीत असल्याकडे अमेरिकी अभ्यासगटाने लक्ष वेधले होते.

leave a reply