हॉंगकॉंगवरून ब्रिटन-चीन राजनैतिक संघर्ष पेटला

लंडन/बीजिंग – हॉंगकॉंग व चीनच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचे थांबवा; नाहीतर असे प्रयत्न तुमच्याच अंगलट येतील अशी धमकी चीनने ब्रिटनला दिली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नुकताच ३० लाख हॉंगकॉंगवासियांना ब्रिटिश नागरिकत्व देण्याची तयारी सुरू असल्याचा इशारा दिला होता. पंतप्रधान जॉन्सन यांच्या ह्या इशाऱ्याने चीन संतापला असून उलट ब्रिटनलाच धमकावण्याचा सुरुवात केली आहे. ब्रिटन व चीनमध्ये सुरू झालेली ही शाब्दिक चकमक दोन देशांमध्ये राजनैतिक संघर्ष पेटल्याचे स्पष्ट संकेत देत आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी, हॉंगकॉंगच्या मुद्यावर लिहिलेला एक विशेष लेख बुधवारी ‘टाइम्स ऑफ लंडन’ या दैनिकात प्रसिद्ध झाला आहे. या लेखातून जॉन्सन यांनी, हॉंगकॉंगच्या मुद्द्यावर चीनवर जबरदस्त टीका केली. ‘चीनकडून हॉंगकॉंगवर लादण्यात येणारा नवा सुरक्षा कायदा या शहराची स्वायत्तता व जनतेला असलेले स्वातंत्र्य हिरावून घेणारा आहे. ब्रिटन व चीनमध्ये १९९७ साली झालेल्या करारानुसार हॉंगकॉंगसाठी एक देश, दोन व्यवस्था ही यंत्रणा लागू आहे. मात्र चीनचा कायदा या कराराचे उघड उल्लंघन करतो”, अशा शब्दात ब्रिटनच्या पंतप्रधानांनी चीनच्या हालचालीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

चीनच्या राजवटीने कायदा लादण्यासाठी हालचाली सुरू ठेवल्या तर ब्रिटनसमोर दुसरा पर्याय उरणार नाही, असे बजावत पंतप्रधान जॉन्सन यांनी सुमारे ३० लाख हॉंगकॉंगवासियांना ब्रिटिश नागरिकत्व देण्यात येईल, असा इशारा चीनला दिला. हॉंगकॉंगची लोकसंख्या सुमारे ७५ लाख असून त्यातील साडेतीन लाख नागरिकांकडे ब्रिटनचा पासपोर्ट आहे. उर्वरित लोकसंख्येमधील जवळपास २५ लाखांहून अधिक नागरिक ब्रिटनच्या नागरिकत्वासाठी पात्र ठरू शकतात. त्यांना नागरिकत्व देण्यासाठी ब्रिटन आपल्या व्हिसा व नागरिकत्वसंदर्भातील कायद्यात मोठे बदल करेल, असे संकेत जॉन्सन यांनी लेखातून दिले आहेत.

या सुमारे ३० लाख हॉंगकॉंगवासियांव्यतिरिक्त इतर नागरिकही जर हॉंगकॉंगमधून बाहेर पडणार असतील तर त्यांची व्यवस्था करण्यासाठी ब्रिटन आपल्या मित्रदेशांशी बोलणी करत आहे, असेही पंतप्रधान जॉन्सन यांनी म्हटले आहे. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी काही दिवसांपूर्वी हॉंगकॉंगच्या मुद्द्यावर केलेल्या एका वक्तव्यात, ब्रिटन ‘फाईव्ह आईज’ गटातील देशांबरोबर चर्चा करीत असल्याचे सांगितले होते. या गटाचा भाग असलेल्या अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांनीही हॉंगकॉंगमधील नागरिकांना आश्रय द्यावा, असा प्रस्ताव ब्रिटनकडून ठेवण्यात आला आहे.

हॉंगकॉंग मुद्द्यावर ब्रिटनकडून सुरू असलेल्या या हालचालींनी चीन संतापला असून ब्रिटनला धमकावण्यास सुरुवात केली आहे. ‘ब्रिटनने एक पाऊल मागे जाऊन आपली शीतयुद्धकालीन मानसिकता व वसाहतवादी दृष्टिकोन सोडून द्यावा. हॉंगकॉंग चीनला दिले आहे हे वास्तव स्वीकारून त्याचा आदर राखावा’, अशा शब्दात चीनच्या परराष्ट्र विभागाने ब्रिटनच्या पंतप्रधानांना सुनावले. ब्रिटनने हॉंगकॉंगसह चीनच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्न थांबवावेत, अन्यथा ते अंगलट येऊन गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही चीनचे प्रवक्ते झाओ लीजिअन यांनी दिली.

चीनच्या या धमकीवर ब्रिटनकडून तात्काळ प्रतिक्रिया उमटली आहे. ‘हॉंगकॉंग सुरक्षा कायद्याबाबत चीनच्या हालचाली ब्रिटन व चीनमधील संयुक्त कराराचे उघड उल्लंघन ठरते. त्यामुळे ब्रिटन हॉंगकॉंगच्या जनतेबरोबर असलेले ऐतिहासिक संबंध व मैत्री ध्यानात ठेवून पुढील पावले उचलेल’, असे ब्रिटिश पंतप्रधानांच्या प्रवक्त्याने बजावले.

leave a reply