पाश्चिमात्यांच्या दडपणामुळे युक्रेनची प्रतिहल्ल्यांची मोहीम अपयशी ठरु शकते

- अमेरिकेच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांचा इशारा

वॉशिंग्टन/किव्ह – युक्रेनवर सातत्याने दडपण टाकत राहिल्यास रशियाविरोधातील प्रतिहल्ल्यांची मोहीम अपयशी ठरू शकते, असा इशारा अमेरिकेचे माजी लष्करी अधिकारी बेन हॉजेस यांनी दिला. तर ब्रिटनच्या माजी लष्करप्रमुखांनी युक्रेनला रशियाविरोधातील युद्ध याच वर्षात जिंकावे लागेल, अन्यथा शस्त्रसहाय्य गमावण्याची वेळ ओढवेल असे बजावले आहे. ही वक्तव्ये समोर येत असतानाच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी युरोप दौऱ्यादरम्यान ब्रिटन व फ्रान्सकडून मोठ्या शस्त्रपुरवठ्याचे आश्वासन मिळविल्याचे वृत्त समोर आले आहे.

पाश्चिमात्यांच्या दडपणामुळे युक्रेनची प्रतिहल्ल्यांची मोहीम अपयशी ठरु शकते - अमेरिकेच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांचा इशारागेल्या काही महिन्यात युक्रेनच्या ‘स्प्रिंग काऊंटरऑफेन्सिव्ह’चा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येताना दिसत आहे. युक्रेनने त्यासंदर्भात केलेली घोषणा, पाश्चिमात्य देशांनी दिलेले प्रशिक्षण व शस्त्रपुरवठा, युक्रेनच्या संभाव्य योजना याबद्दल पाश्चिमात्य माध्यमे, विश्लेषक तसेच यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी सुरू आहे. पण गेल्या काही दिवसात युक्रेनचे नेते व अधिकाऱ्यांकडून त्याबद्दल परस्परविरोधी वक्तव्ये येण्यास सुरुवात झाली होती.

काही अधिकाऱ्यांनी गेल्या काही आठवड्यांमध्ये रशियावर केलेले हल्ले हा प्रतिहल्ल्यांचा भाग असल्याचा दावा केला होता. गेल्या वर्षी युक्रेनने ज्याप्रमाणे रशियाविरोधात कारवाई केली, तशी मोहीम यावेळी राबविण्यात येणार नसल्याचे युक्रेनच्या काही नेत्यांकडून सांगण्यात आले. तर प्रतिहल्ल्यांची मोहीम म्हणजे निर्णायक लढाई नसल्याचे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांनी बजावले होते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी प्रतिहल्ल्यांसाठी अजून वेळ लागेल, तयारी सुरू आहे असे वक्तव्य केले.

पाश्चिमात्यांच्या दडपणामुळे युक्रेनची प्रतिहल्ल्यांची मोहीम अपयशी ठरु शकते - अमेरिकेच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांचा इशारायुक्रेनकडून येणारी ही वक्तव्ये पाश्चिमात्यांकडून युक्रेनवर टाकण्यात येणाऱ्या दबावातून येत असल्याचा दावा काही विश्लेषक व माजी अधिकारी करीत आहेत. अमेरिकेच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेला इशाराही त्याचाच भाग ठरतो. ‘पाश्चिमात्यांकडून युक्रेनवर प्रचंड दबाव टाकण्यात येत आहे. प्रतिहल्ले म्हणजे संपूर्ण विजयासाठीची पूर्वतयारी असल्याचे चित्र तयार केले जात आहे. अशा प्रकारच्या दबावामुळे सदर मोहीम अपयशी ठरण्याची भीती आहे’ असे हॉजेस यांनी बजावले.

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या युरोप दौऱ्यात ब्रिटनने मोठ्या शस्त्रसहाय्याची घोषणा केल्याचे समोर येत आहे. यात दीर्घपल्ल्याच्या ‘अटॅक ड्रोन्स’सह नव्या क्षेपणास्त्रांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.

हिंदी

 

leave a reply