युक्रेनकडून रशियाच्या तीन प्रांतांमध्ये ड्रोन हल्ले

- इंधनप्रकल्पासह लष्करी कार्यालय व वीजपुरवठा यंत्रणा लक्ष्य

किव्ह/मॉस्को/लंडन – गेल्या आठवड्यात क्रिमिआवर केलेल्या ड्रोन हल्ल्यांनंतर युक्रेनने बुधवारी रशियाच्या तीन प्रांतांना लक्ष्य केले. युक्रेन सीमेला जोडून असलेल्या बेलगोरोद, ब्रिआन्स्क व कुर्स्क प्रांतात ड्रोन हल्ले चढविण्यात आले. या हल्ल्यांमध्ये इंधनप्रकल्पासह लष्करी कार्यालय तसेच वीजपुरवठा केंद्राला लक्ष्य करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच युक्रेनच्या एका अधिकाऱ्याने ‘स्प्रिंग काऊंटरऑफेन्सिव्ह’दरम्यान रशियातील ड्रोन हल्ले वाढू शकतात, असे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेले हल्ले लक्ष वेधून घेणारे ठरतात.

युक्रेनकडून रशियाच्या तीन प्रांतांमध्ये ड्रोन हल्ले - इंधनप्रकल्पासह लष्करी कार्यालय व वीजपुरवठा यंत्रणा लक्ष्यरशिया-युक्रेन युद्धाला वर्ष उलटल्यानंतर रशियाने युक्रेनच्या विविध प्रांतांमध्ये प्रखर हल्ले सुरू केले असून त्यांची तीव्रताही वाढविली आहे. क्षेपणास्त्रे, ड्रोन्स, रॉकेटस्‌‍ व मॉर्टर्सचा सातत्याने मारा करण्यात येत आहे. युक्रेन तसेच पाश्चिमात्य देशांनीही त्याला दुजोरा दिला आहे. रशियाच्या या माऱ्याला प्रत्युत्तर देण्यासाठी युक्रेनने ड्रोन हल्ले करण्याचा पर्याय स्वीकारल्याचे समोर येत आहे.

रशियन प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया व इतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2023 सालच्या सुरुवातीपासून युक्रेनने रशियात जवळपास 30हून अधिक ड्रोन हल्ले केले आहेत. यातील सर्वाधिक ड्रोन हल्ले क्रिमिआ व भोवतालच्या परिसरात आहेत. त्यानंतर ब्रिआन्स्क व बेलगोरोद प्रांताला लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात युक्रेनी ड्रोन्सनी रशियाची राजधानी मॉस्कोवरही हल्ले केले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची हत्या घडविण्यासाठी युक्रेनने ड्रोन हल्ला केल्याचा गंभीर आरोप रशियाने केला होता.

या पार्श्वभूमीवर, 24 तासांमध्ये तीन प्रांतांमध्ये झालेले ड्रोन हल्ले रशियासाठी चिंतेची बाब ठरते. युक्रेनकडून रशियाच्या तीन प्रांतांमध्ये ड्रोन हल्ले - इंधनप्रकल्पासह लष्करी कार्यालय व वीजपुरवठा यंत्रणा लक्ष्यबुधवारी ब्रिआन्स्क प्रांतात रशियाकडून युरोपला पुरविण्यात येणाऱ्या इंधनवाहिनी प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आले. ‘ड्रुझ्बा पाईपलाईन’साठी वापरण्यात येणाऱ्या ‘फिलिंग टँक्स’वर ड्रोन हल्ला करण्यात आला. हल्ल्यात टाक्यांचे नुकसान होऊन आग लागल्याचे सांगण्यात येते. या प्रकल्पाला लक्ष्य करण्याची गेल्या वर्षभरातील ही चौथी घटना ठरली आहे. यापूर्वी ऑगस्ट 2022 तसेच 2023मध्ये फेब्रुवारी तसेच मार्च महिन्यात सदर इंधनप्रकल्पावर हल्ले चढविण्यात आले होते.

इंधनप्रकल्पापाठोपाठ स्टारोडब शहरातील लष्करी कार्यालयावरही ड्रोन हल्ला करण्यात आला. हल्ल्यामध्ये एका इमारतीला मोठी आग लागल्याची माहिती सोशल मीडियावर देण्यात आली. ब्रिआन्स्क प्रांताच्या प्रशासनाने ड्रोन हल्ला व आगीच्या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र त्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचा खुलासा केला.

युक्रेनकडून रशियाच्या तीन प्रांतांमध्ये ड्रोन हल्ले - इंधनप्रकल्पासह लष्करी कार्यालय व वीजपुरवठा यंत्रणा लक्ष्यब्रिआन्स्क प्रांताबरोबरच बेलगोरोद व कुर्स्क प्रांतातही ड्रोन हल्ले झाले. बेलगोरोद प्रांतात तीन ड्रोन हल्ले झाले असून दोन ड्रोन्सचा नागरी वस्तीत स्फोट झाल्याचे स्थानिक गव्हर्नरकडून सांगण्यात आले. कुर्स्क प्रांतात त्योत्किनो भागातील वीजकेंद्र लक्ष्य करण्यात आले. वीजकेंद्रावर एकापाठोपाठ एक अशा पाच ड्रोन्सनी हल्ला केला. त्यामुळे वीजकेंद्रासह ग्रिडचे नुकसान झाले असून वीजपुरवठा काही तासांकरता खंडित झाल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, युक्रेनच्या संभाव्य प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेसाठी ब्रिटनने युक्रेनला दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे पुरविल्याचे उघड झाले आहे. ब्रिटनने युक्रेनला दिलेल्या ‘स्टॉर्म शॅडो क्रूझ मिसाईल्स’चा पल्ला 250 किलोमीटर्स व त्याहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. अमेरिका व ब्रिटनच्या प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले असून ब्रिटनच्या सरकारने त्याला दुजोरा दिला आहे. ब्रिटनच्या या निर्णयावर जशास तसे प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा रशियाने दिला.

हिंदी

 

leave a reply