युक्रेनमध्ये जैविक प्रयोगशाळा असल्याची अमेरिकेची कबुली

वॉशिंग्टन – जैविक शस्त्रास्त्रांची निर्मिती करणार्‍या प्रयोगशाळा अमेरिकेने युक्रेनमध्ये उभारल्याचा आरोप रशियाने केला होता. याचे पुरावे आपल्या हाती सापडले असून काही पुरावे रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला त्याच दिवशी अमेरिकेने नष्ट केल्याचे रशियाने म्हटले होते. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या उपमंत्री व्हिक्टोरिया नुलँड यांनी युक्रेनमध्ये जैविक प्रयोगशाळा असल्याचे मान्य केले. पण आता यावरील संशोधन रशियन सैन्याच्या हाती पडेल, असे सांगून नुलँड यांनी त्यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

युक्रेन आण्विक किंवा जैविक शस्त्रास्त्रांची निर्मिती करीत असल्याचा आरोप करून रशिया युक्रेनवरील आपल्या हल्ल्याचे समर्थन करीत आहे, असा आरोप ब्रिटनच्या लष्करी गुप्तचर यंत्रणेने केला होता. त्यानंतर काही तासांनी अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या उपमंत्री व्हिक्टोरिया नुलंड यांनी सिनेटच्या सुनावणीसमोर बोलताना युक्रेनमधील हल्ल्यांसाठी रशियाला धारेवर धरले.

‘युक्रेनमध्ये जैविक संशोधन केंद्रे आहेत. पण आत्ता ही संशोधन केंद्रे रशियन लष्कराच्या ताब्यात जाऊ शकतात. त्यामुळे या केंद्रांमधील संशोधन रशियन लष्कराच्या हाती पडू नये, यासाठी अमेरिका युक्रेनला सहाय्य करीत आहे’, असे सांगून नुलँड यांनी युक्रेनमधील जैविक संशोधन केंद्रांचे आणि त्यातील सहभागाचे समर्थन केले.

यानंतर अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर मार्को रुबियो यांनी नुलँड यांना प्रतिप्रश्‍न केला. युक्रेन नाटोच्या सहाय्याने जैविक हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा दावा रशियन माध्यमे करीत असून यात किती तथ्य आहे? येत्या काळात युक्रेनमध्ये जैविक किंवा रासायनिक हल्ला झाला, तर त्यासाठी रशिया जबाबदार असेल का? असे सवाल रुबियो यांनी केले. यावर बोलताना, अमेरिकेच्या उपमंत्री नुलँड यांनी रशिया युक्रेनध्ये जैविक हल्ला घडवू शकतो व त्याचे खापर इतरांवर फोडेल, असा आरोप केला.

पण याद्वारे अमेरिकेच्या उपमंत्री युक्रेनमध्ये जैविक प्रयोगशाळांमध्ये शस्त्रनिर्मिती सुरू होती, याची अप्रत्यक्ष कबुली देत असल्याचे काही माध्यमे लक्षात आणून देत आहेत. त्याचबरोबर अमेरिका या प्रयोगशाळांना पैसा पुरवित असल्याच्या रशियाच्या आरोपांना यामुळे बळ मिळत असल्याचे नुलँड यांच्या प्रतिक्रियेवरुन उघड होत आहे, असेही या माध्यमांचे म्हणणे आहे.

रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी युक्रेनमधील जैविक प्रयोगशाळांवरुन अमेरिकेला लक्ष्य केले. ‘अमेरिकेला रशियाच्या सीमेजवळ युक्रेनमध्ये जैविक शस्त्रनिर्मितीची प्रयोगशाळा का सुरू करावीशी वाटली, याबाबत अमेरिकेने फक्त रशियाच नाही तर संपूर्ण जगाला उत्तर द्यावे. युक्रेनमधील ३० प्रयोगशाळांचा वापर शांतीसाठी किंवा वैज्ञानिक उद्दिष्टांसाठी सुरू होता, याबाबत आम्हाला खुलासा नको. तर रशियाच्या सीमेजवळ या प्रयोगशाळांची उभारणी का झाली आणि त्याला अमेरिकेने पैसा का पुरविला? याचे उत्तर अमेरिकेने द्यावे’, अशी मागणी झाखारोव्हा यांनी केली.

युक्रेनमधील जैविक प्रयोगशाळांमध्ये प्लेग, अँथ्रॅक्स, कॉलेरा, ट्युलारेमिया आणि काही इतर विषारी विषाणूंवर संशोधन सुरू असल्याचा आरोप रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला होता. अमेरिकेच्या या जैविक प्रयोगशाळांवर रशियाने प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर चीनने देखील अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनकडे खुलासा मागितला आहे. पेंटॅगॉनने जगभरातील आपल्या जैविक प्रयोगशाळांची माहिती उघड करावी, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

leave a reply