अमेरिकेच्या जैविक लष्करी हालचाली आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक

- रशियाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा इशारा

जैविक लष्करीमॉस्को – ‘अमेरिकेच्या जैविक-लष्करी हालचालींमध्ये वाढ झाली आहे. या आघाडीवरील आपले सामर्थ्य वाढविण्याचा तसेच जगभरात त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न अमेरिका करीत आहे. जैविक संशोधनाबाबत अमेरिकेच्या या लष्करी हालचाली आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहेत’, असा इशारा रशियाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी दिला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायाने अमेरिकेच्या या संशोधनांचे सखोल निरिक्षण सुरू करावे, अशी मागणी रशियाने केली.

रशियाच्या सीमेजवळ युक्रेनमध्ये अमेरिकेने जैविक लष्करी प्रयोगशाळा उभारल्या होत्या. या ठिकाणी जैविक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीवर संशोधन सुरू होते, असा आरोप रशियाने केला होता. युक्रेन युद्धासाठी रशियावर टीका करणाऱ्या आंतरराष्ट्रीय समुदायाने युक्रेनमधील जैविक प्रयोगशाळांबाबत अमेरिकेला जबाबदार धरावे, अशी मागणी रशियाने केली होती. आंतरराष्ट्रीय संघटनेची मान्यता नसलेल्या या प्रयोगशाळा सीमेजवळ उभारून अमेरिकेने रशियाच्या सुरक्षेला आव्हान दिल्याचा ठपका रशियन लष्करी अधिकाऱ्यांनी ठेवला होता. यानंतर अमेरिकन सिनेटमध्ये पेंटॅगॉनच्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली होती. यावेळी युक्रेनमध्ये जैव संशोधन प्रयोगशाळा असल्याची कबुली पेंटॅगॉनच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. तर जगभरातील अमेरिकेच्या प्रयोगशाळांमध्ये जैविक संशोधनाचा वापर दोन्ही क्षेत्रात होत असल्याची कबुली, अमेरिकेच्या ‘नॅशनल बायोडिफेन्स स्ट्रॅटजी’मधील अहवालात देण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध झालेल्या या अहवालाचा दाखला देऊन रशियाने अमेरिकेच्या जैविक हालचाली धोकादायक असल्याचा इशारा दिला.

जैविक लष्करीजगभरातील वेगवेगळ्या भागात पेंटॅगॉनकडून सुरू असलेल्या जैविक लष्करी हालचाली आंतरराष्ट्रीय समुदायासाठी धोकादायक ठरू शकतात, असा इशारा रशियाच्या ‘न्यूक्लिअर, बायोलॉजिकल अँड केमिकल डिफेन्स ट्रूप्स’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह यांनी दिला. जैव तंत्रज्ञानाचा वापर चुकीच्या कारणांसाठी होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे पेंटॅगॉनने म्हटले आहे. तरी देखील रशियाने अमेरिकेच्या हेतूवर संशय असल्याचे लेफ्टनंट जनरल किरिलोव्ह म्हणाले. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने जगभरातील अमेरिकेच्या या प्रयोगशाळांचे निरिक्षण करावे, अशी मागणी किरिलोव्ह यांनी केली.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यातच रशियाने अमेरिकेच्या या प्रयोगशाळांच्या चौकशीची मागणी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेकडे केली होती. पण अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सने नकाराधिकार वापरून रशियाची ही मागणी धुडकावून लावली होती. येत्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जीनिव्हा येथे ‘बायोलॉजिकल वेपन्स कन्वेंशन’ पार पडेल आहे. या बैठकीतही रशिया अमेरिकेच्या या जैविक प्रयोगशाळांचा मुद्दा उपस्थित करणार आहे.

leave a reply