रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी शिष्टमंडळाची व्हेनेझुएलाला भेट

कॅराकस – रशिया-युक्रेन युद्धावरून रशियावर व्यापक निर्बंध लादणार्‍या अमेरिकेने आता रशियाच्या मित्रदेशांवर दडपण आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकी नेते व अधिकार्‍यांनी भारत, चीन तसेच ब्राझिलला रशियाबाबत घेतलेल्या भूमिकेवरून इशारे दिले होते. त्यानंतर आता लॅटिन अमेरिकेतील व्हेनेझुएलावर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शनिवारी अमेरिकेच्या उच्चस्तरिय शिष्टमंडळाने व्हेनेझुएलाला भेट दिल्याचे वृत्त अमेरिकी माध्यमांनी दिले आहे.

रशिया-युक्रेनव्हाईट हाऊस व अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी शनिवारी व्हेनेझुएलाचा दौरा केला. अधिकार्‍यांची नावे उघड करण्यात आली नसून व्हाईट हाऊस तसेच परराष्ट्र विभागाने याबाबत माहिती देण्याचेही टाळले आहे. त्यामुळे या दौर्‍याबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

गेल्या काही वर्षात अमेरिकेने व्हेनेझुएलाचे हुकुमशहा निकोलस मदुरो व प्रशासनावर मोठे निर्बंध लादले आहेत. व्हेनेझुएलात राजवट बदलण्याचा प्रयत्नही करण्यात आला, मात्र त्याला यश मिळालेले नाही. अमेरिकेच्या या कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर व्हेनेझुएलाने रशिया व चीनबरोबरील जवळीक वाढविली आहे. रशियाने व्हेनेझुएलात छुपा लष्करी तळ उभारल्याचे सांगण्यात येत असून काही वर्षांपूर्वी रशियन बॉम्बर्सदेखील या देशात दाखल झाली होती.

काही दिवसांपूर्वी रशियाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्हेनेझुएलाला भेटही दिली होती. या भेटीत राष्ट्राध्यक्ष मदुरो यांनी रशियाबरोबरील संरक्षणसहकार्य वाढविण्यास मान्यता दिल्याचे समोर आले होते. अशा स्थितीत अमेरिकी शिष्टमंडळाने व्हेनेझुएलाला भेट देणे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. अमेरिकी शिष्टमंडळाची भेट, निर्बंध टाकलेल्या व्हेनेझुएलाकडून तेलाची आयात करता येईल का, याची चाचपणी करण्यासाठी होती, असा दावा काही विश्‍लेषकांनी केला आहे.

leave a reply