अमेरिकेकडून हिंदी महासागर क्षेत्रात ‘बी-२’ बॉम्बर्सची तैनाती

- चीनसाठी इशारा

नवी दिल्ली/वॉशिंग्टन – अमेरिकेने हिंदी महासागरातील डिएगो गार्सिया बेटावरील तळावर बी-२ स्टेल्थ बॉम्बर विमाने तैनात केली आहेत. अमेरिकेने जगातील सर्वात घातक बॉम्बर्स विमानांची तैनाती करून चीनला खरमरीत संदेश दिला, असल्याचा दावा केला जातो. शुक्रवारी अमेरिकेच्या संसदेत लडाखमधील चीनची घुसखोरी आणि आक्रमकते विरोधात निंदा प्रस्ताव ठेवण्यात आला. तसेच यावेळी चीनच्या आक्रमकते विरोधात खडे ठाकणाऱ्या आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सार्वभौमत्व राखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भारताची प्रशंसा करण्यात आली. भारताचे समर्थन करणे कधीनव्हे इतके महत्वाचे बनल्याचे अमेरिकेच्या संसद सदस्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हिंदी महासागर क्षेत्रात केलेली तैनाती अधिक लक्षवेधी ठरत आहे.

'बी-२' बॉम्बर्स

‘साऊथ चायना सी’ क्षेत्रात चीनच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी अमेरिकेने आपल्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. तसेच तैवानबरोबर आपले सामरिक सहकार्य वाढवून त्याच्या संरक्षण सज्जतेसाठी अमेरिका प्रयत्न करीत आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने अमेरिकेला इशारा देण्याकरिता ‘साऊथ चायना सी’मधील एका युद्धसरावात बॉम्बर्सचा वापर केला होता. तसेच साऊथ चायना सी मधील आपल्या तळावर चीनने बॉम्बर्स तैनात केल्याच्या बातम्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मालदीव नजीक असलेल्या हिंदी महासागरातील डिएगो गार्सिया येथील आपल्या सर्वात मोठ्या लष्करी तळावर बी-२ स्टेल्थ बॉम्बर तैनात केल्याची बातमी आहे. अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडच्या अधिकाऱ्यांनी याची घोषणा केली.

'बी-२' बॉम्बर्स

एका वेळी १६ अण्वस्त्रवाहून नेऊ शकणाऱ्या, शत्रूंच्या रडारला गुंगारा देण्याची क्षमता असलेल्या आणि आकस्मित हल्ल्यासाठी अत्यंत प्रभावी असलेल्या ‘बी-२’ बॉम्बर्स ची तैनाती चीनसाठी संदेश ठरतो, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. ही विमाने शस्त्रास्त्रांनी पूर्ण सज्ज असतानाही ११ हजार किलोमीटर इतके उड्डाण करू शकतात. त्यामुळे एकाचवेळी हिंदी महासागर आणि पॅसिफिकमधील आपले मित्र देश आणि अमेरिकेच्या हिताच्या संरक्षणासाठी ही तैनाती केल्याचे दावे केले जात आहेत. तसेच हिंदी महासागरातील या तैनातीतून आपण भारताची पूर्णपणे साथ देऊ, असे संकेतही अमेरिकेने दिल्याचे दावे केले जात आहेत. त्यामुळे याकडे भारत आणि अमेरिकेतील वाढत्या सामरिक सहकार्याच्या दृष्टीनेही पाहण्यात येत आहे.

'बी-२' बॉम्बर्स

लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीनंतर भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर खडे ठाकलेल्या १०० दिवस उलटले आहेत. गलवानमधील विश्वासघातानंतर भारत चीनवरोधात आक्रमक झाला असून चीनला अनेक पातळ्यांवर उत्तर देत आहे. भारताने चीनविरोधात एकट्याने खडे ठाकण्याची आपली क्षमता दखविल्याचे, विश्लेषकांचे म्हणणे आहे. नुकतेच एका युरोपियन अभ्यास गटानेही याची दखल घेत भारताने एकट्यानेच दाखविलेल्या आक्रमकतेमुळे चीनला हैराण केल्याच्या दावा आपल्या अहवालात केला होता. त्याचवेळी चीनविरोधात अमेरिका, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांचे सहकार्यही अधिक भक्कम होत असून हे सहकार्याने चीन धास्तावल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

गेल्या महिन्यात अमेरिकेच्या ‘युएसएस निमित्झ’ या जगातील सर्वात मोठ्या विमानवाहू युद्धनौकेने अंदमान निकोबार बेटाजवळ भारताबरोबरील युद्धसरावात भाग घेतला होता. १९७१ नंतर प्रथमच अमेरिकेच्या विमानवाहू यद्धनौका या क्षेत्रात आली होती. त्यानंतर आता अमेरिकेने ‘बी-२’ सारखी अत्यंत घातक स्टेल्थ बॉम्बर विमाने तैनात केली आहेत. यातून चीनला सामरिक संदेश दिला जात असल्याचे स्पष्ट होते.

leave a reply