चीनच्या इशाऱ्यानंतरही अमेरिकी विनाशिकेची तैवानच्या सामुद्रधुनीतून गस्त

वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेने नौदल वर्चस्व गाजवून चिथावणी देऊ नये, या चीनच्या इशाऱ्यानंतरही अमेरिकेची विनाशिका पुन्हा एकदा चीन व तैवानमधील सागरी क्षेत्रात दाखल झाली आहे. अमेरिकेच्या ‘युएसएस बॅरी’ या विनाशिकेने बुधवारी तैवानच्या सामुद्रधुनीतून गस्त घातली. गेल्या सहा दिवसात अमेरिकेच्या विनाशिकेने तैवानच्या सागरी क्षेत्रातून गस्त घालण्याची ही दुसरी वेळ आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या ‘मरिन कॉर्प्स’ला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिल्यानंतर अवघ्या २४ तासात अमेरिकी विनाशिकेने तैवाननजिक गस्त घालणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

सामुद्रधुनीतून गस्त

गेल्या आठवड्यात शुक्रवारी अमेरिकी नौदलातील ‘युएसएस जॉन मॅक्केन’ य प्रगत विनाशिकेने साऊथ चायना सीमधील ‘पॅरासेल आयलंड’जवळ गस्त घातली होती. अमेरिकी विनाशिकेच्या या मोहिमेवर चीनने आक्रमक प्रतिक्रिया नोंदवली होती. अमेरिकी विनाशिकेने चीनच्या परवानगीशिवाय सागरी हद्दीत प्रवेश करणे ही उघड लष्करी चिथावणी असून, अशा कारवायांमुळे या क्षेत्रात दुर्घटना घडू शकते, असे चीनने बजावले होते. मात्र  हा इशारा धुडकावित अमेरिकेने आपली विनाशिका तैवाननजिक धाडून, आपण चीनच्या वक्तव्यांना किंमत देत नसल्याचे दाखवून दिले आहे. उलट, ‘फ्री अँड ओपन इंडो-पॅसिफिक’ व ‘फ्रीडम ऑफ नॅव्हिगेशन’ धोरणानुसार अमेरिकी नौदलाच्या युद्धनौका यापुढेही सातत्याने साऊथ चायना सीमध्ये मोहिमा राबवित राहतील, असे अमेरिकी नौदलाकडून स्पष्ट करण्यात आले.

‘युएसएस बॅरी’ने तैवाननजिक घातलेल्या गस्तीवरही चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ‘अमेरिका या क्षेत्रातील शांती व स्थैर्याला गंभीर धोका उत्पन्न करीत आहे. त्याचवेळी अमेरिकेच्या कारवाया तैवानच्या जनतेला चुकीचे संदेश देत आहेत’, असा ठपका चीनचे प्रवक्ते झँग शुन्हुई यांनी ठेवला. यावेळी चीनच्या नौदलाने अमेरिकी विनाशिकेचा पाठलाग केल्याचा दावाही त्यांनी केला. अमेरिकी विनाशिकेच्या मोहिमांवर नाराजी व्यक्त करणाऱ्या चीनने दोन नव्या विनाशिका आपल्या नौदलात सामील केल्याची माहिती समोर आली आहे.

सामुद्रधुनीतून गस्त

चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. ‘किकिहार’ व ‘टँगशन’ अशी या दोन विनाशिकांची नावे असून दोन्ही विनाशिका ‘०५२डी’ वर्गातील असल्याचे सांगण्यात येते. चीनने या वर्षात नौदलात सामील केलेल्या विनाशिकांची संख्या चार झाली असून, ही बाब चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींना दुजोरा देणारी ठरते. चीनच्या नौदलातील विनाशिकांची संख्या २० वर गेली असून, चीनच्या नौदलाने संख्याबळाच्या बाबतीत अमेरिकी नौदलाला मागे टाकल्याचा इशारा अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अहवालात नुकताच देण्यात आला होता.

leave a reply