चीनच्या मुद्यावर अमेरिका व युरोपमध्ये चर्चा होणार – युरोपने अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांचा प्रस्ताव स्वीकारला

वॉशिंग्टन – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनच्या मुद्यावर चर्चा करण्याबाबत दिलेला प्रस्ताव युरोपने स्वीकारल्याचे संकेत मिळाले आहेत. येत्या काही दिवसात ही चर्चा होईल असे सांगण्यात येत असून ही बाब चीनला मोठा धक्का देणारी ठरते. अमेरिकेने चीनविरोधात उघड राजनैतिक संघर्ष पुकारला असून, त्याविरोधात युरोपची साथ मिळविण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू होते. मात्र गेल्या काही महिन्यात युरोपमध्येही चीनविरुद्ध प्रचंड असंतोष असून संबंध पूर्वीप्रमाणे सुरळीत राहणार नसल्याचे युरोपिय नेतृत्वाने स्पष्टपणे बजावले आहे.

चर्चा

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने गेल्या काही महिन्यात चीनविरोधातील संघर्षाची धार अधिकाधिक तीव्र करण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीची धोरणे व कारवायांचा पर्दाफाश करून त्या रोखण्यासाठी आक्रमक निर्णय घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चीनविरोधात व्यापक जागतिक आघाडी उघडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. युरोपिय देशांनी यात सहभागी व्हावे यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. हॉंगकॉंग व उघुरवंशीयांवरील अत्याचाराच्या मुद्यावर युरोपने अमेरिकेच्या भूमिकेला साथ दिली होती. त्यापुढे जाऊन ५जी तंत्रज्ञान, व्यापार, साऊथ चायना सी, तैवान यासारख्या मुद्यांवरही युरोपने अमेरिकेला साथ द्यावी यासाठी अमेरिकेने पावले उचलली आहेत.

गेल्या काही महिन्यात अमेरिकेने युरोपबरोबर झालेल्या बहुतांश राजनैतिक चर्चांमध्ये चीनचा मुद्दा उपस्थित केला होता. चीनच्या मुद्यावर युरोपने ठाम धोरण स्वीकारावे, अशी अमेरिकेची भूमिका आहे. मात्र चीनचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असणाऱ्या युरोपने त्याला फारसा सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर, अमेरिकी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांचा ‘चायना डायलॉग’चा प्रस्ताव स्वीकारून युरोपिय नेतृत्वाने चीनच्या मुद्यावर स्पष्ट व आक्रमक धोरण स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत.

चर्चा

युरोपचा हा निर्णय चीनसाठी मोठा धक्का ठरला आहे. गेल्या महिन्याभरात चीनने आपले परराष्ट्रमंत्री वँग यी व वरिष्ठ नेते यांग जीएची या दोन्ही प्रमुख नेत्यांना युरोप दौऱ्यावर धाडले होते. कोरोना व इतर मुद्यांवरून युरोपबरोबर दुरावणारे संबंध पूर्ववत करणे आणि अमेरिकेविरोधात सहकार्य हे त्यामागील उद्देश होते. मात्र चीनचे हे इरादे धुळीस मिळाल्याचे अमेरिका व युरोपमध्ये होणाऱ्या चायना डायलॉगवरून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, युरोपिय नेतृत्वाबरोबर चीनच्या मुद्यावर चर्चा करण्याबरोबरच अमेरिकी परराष्ट्रमंत्री युरोपला भेट देणार असल्याचेही समोर येत आहे. परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ इटलीला भेट देणार असून चीनबरोबरील प्रकल्पांमधून इटलीने बाहेर पडावे, यासाठी बोलणी करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

leave a reply