दक्षिण कोरियामध्ये अमेरिकेच्या स्पेस फोर्सचा पहिला तळ

स्पेस फोर्सचा पहिला तळसेऊल – अमेरिकेच्या संरक्षणदलाने स्पेस फोर्सचा पहिला तळ दक्षिण कोरियामध्ये सुरू केला आहे. याद्वारे उत्तर कोरिया, चीन आणि रशियाच्या धोकादायक हालचालींवर नजर ठेवण्यात सहाय्य मिळेल, असा दावा अमेरिकेच्या संरक्षणदलाने केला. ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाने देखील याच महिन्यात स्वत:चे स्वतंत्र स्पेस फोर्स युनिट तयार केले आहे. दरम्यान, पेंटॅगॉनने अमेरिका किंवा युरोप वगळून थेट दक्षिण कोरियात हा तळ सुरू केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते.

2019 साली तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अंतराळ हे येत्या काळातील संघर्षाचे नवे क्षेत्र ठरू शकते, असा इशारा दिला होता. त्याचबरोबर अमेरिकेच्या सुरक्षेला असलेल्या अंतराळातील धोक्यांचा उल्लेख करून नवी कमांड उभारण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ‘स्पेस फोर्स कमांड’ची स्थापना झाली होती. चीनच्या क्षेपणास्त्रांपासून अंतराळातील अमेरिकेच्या हितसंबंधाना धोका असल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी केला होता.

बुधवारी दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या ओसान हवाईतळावर अमेरिकेच्या या स्पेस फोर्सचा पहिला तळ सुरू करण्यात आला. या स्पेस युनिटचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल जोशूआ मॅकलियन यांनी उत्तर कोरियापासून असलेला धोका अधोरेखित केला. या स्पेस फोर्सच्या सहाय्याने क्षेपणास्त्रांचा माग काढणे सोपे जाईल, असा दावा अमेरिकेने केला आहे.

leave a reply