सौदी अरेबियाला स्वसंरक्षणासाठी अमेरिका सहाय्य करील

-अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाची घोषणा

वॉशिंग्टन – बाह्य धोक्यांपासून सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सारे सहाय्य अमेरिका पुरविणार असल्याची घोषणा अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने केली. सौदीचे उपसंरक्षणमंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्यात झालेल्या भेटीनंतर पेंटॅगॉनने ही माहिती दिली. गेल्या वर्षभरापासून अमेरिका आणि सौदी यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सौदीच्या उपसंरक्षणमंत्र्यांचा अमेरिका दौरा महत्त्वाचा ठरतो, असे पाश्चिमात्य माध्यमांचे म्हणणे आहे.

us-austin-saudi-prince-khalidसौदी अरेबियाचे उपसंरक्षणमंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान यांचा अमेरिका दौरा नुकताच संपन्न झाला. यात सौदीच्या उपसंरक्षणमंत्र्यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन व त्यानंतर परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांची भेट घेतली. ऑस्टिन यांच्याबरोबरच्या बैठकीत प्रिन्स खालिद यांनी इराणचा धोका, येमेनमधील संघर्षबंदी आणि क्षेत्रीय सुरक्षेच्या मुद्यावर चर्चा केली.

सौदीबरोबरच्या मजबूत भागिदारीबाबत अमेरिका वचनबद्ध असल्याचे अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले. तसेच येमेनमधील हौथी बंडखोरांबरोबर झालेली संघर्षबंदी यशस्वी करण्यासाठी सौदीने घेतलेल्या पुढाकाराचे ऑस्टिन यांनी स्वागत केले. यानंतर बाह्य धोक्यांपासून सौदीच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते सहाय्य पुरविण्याच्या आपल्या भूमिकेवर अमेरिका ठाम असल्याचे पेंटॅगॉनने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

पण संरक्षणमंत्री ऑस्टिन आणि पेंटॅगॉनने सौदीच्या सुरक्षेला इराणपासून असलेल्या धोक्याचा वेगळा उल्लेख केला नाही, याकडे अमेरिकन माध्यमे लक्ष वेधत आहेत. याआधी अमेरिकेने सौदी व इतर अरब मित्रदेशांच्या सुरक्षेला इराणपासून धोका असल्याचे अधोरेखित केले होते. तसेच इराणच्या विरोधात आपल्या आखाती मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी आपण उभे असल्याची ग्वाही अमेरिकेने दिली होती.

पण इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी धडपडत असलेल्या बायडेन प्रशासनाच्या भूमिकेत मोठा बदल झाल्याचे संरक्षणमंत्री ऑस्टिन आणि पेंटॅगॉनच्या घोषणेतून उघड होत आहे. अमेरिकेतील काही वृत्तवाहिन्यांनी ही बाब लक्षात आणून दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सौदीची घोर निराशा केल्याची टीका सौदी राजघराण्याचे वरिष्ठ सदस्य करीत आहेत. बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिका व सौदीतील संबंध खालावल्याची चिंता सौदीच्या राजघराण्याच्या सदस्यांनी व्यक्त केली होती.

इराणबरोबरच्या अणुकरारासाठी बायडेन प्रशासनाने सौदी व इतर अरब-आखाती मित्रदेश गमावू नये, असे आवाहन अमेरिकेतील लोकप्रतिनिधी तसेच लष्करी विश्लेषक करीत आहेत. पण बायडेन प्रशासन त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीतही, सौदी व इतर अरब देशांचा विश्वास जिंकण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन येत्या जून महिन्यात आखाताचा दौरा करणार असल्याचा दावा केला जातो. या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेऊ शकतात, असा दावा अमेरिकन माध्यमे करीत आहेत.

leave a reply