अमेरिकेचे इराण संबंधित ११ कंपन्यांवर निर्बंध

वॉशिग्टंन – पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातसंबंधित इराणला सहाय्य करणार्‍या ११ परदेशी कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. यात एका चिनी कंपनीचा समावेश आहे. या कंपन्यांनी इराणवर लादलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केल्याचा आरोप अमेरिका करीत आहे. अमेरिकेने इराणवर निर्बंध लादू नये, यासाठी युरोपिय देश तसेच रशिया, चीन यांच्यात ब्रुसेल्स येथे बैठक सुरू असताना अमेरिकेने इराणवरील या निर्बंधांची घोषणा केली. दरम्यान, अमेरिकेच्या निर्बंधानंतरही इराण कुठल्याही अडथळ्याशिवाय शस्त्रास्त्रांची निर्मिती करू शकतो, अशी चिथावणी इराण देत आहे.

अमेरिकेचे इराण संबंधित ११ कंपन्यांवर निर्बंधगुरुवारी अमेरिकेच्या कोषागार विभागाने इराणला पेट्रोलियम पदार्थ आणि पेट्रोकेमिकल्स निर्यात करण्यासाठी सहाय्य करणार्‍या ११ परदेशी कंपन्यांवर निर्बंधांची कारवाई केली. यात इराणच्या सहा कंपन्या तसेच संयुक्त अरब अमिरात आणि चिनी कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी अवैधरित्या इराणला पेट्रोलियम पदार्थांच्या निर्यातीसाठी सहाय्य करुन इराणवर लादलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. या व्यतिरिक्त हाँगकाँगच्या ‘ट्रिलाईन्स पेट्रोकेमिल्स कंपनी लिमिटेड’वर अतिरिक्त कारवाईची शक्यता वर्तविली आहे. २०२० सालच्या जानेवारी महिन्यात अमेरिकेने या कंपनीवर निर्बंध लादले होते. या कंपनीने लाखो डॉलर्स इराणच्या राष्ट्रीय इंधन कंपनीला दिले होते. याचा वापर दहशतवादी निधीसाठी होत असल्याचा आरोप करुन अमेरिकेने या कंपनीला फटकारले होते. पण यानंतरही सदर कंपनी इराणबरोबरच्या अवैध इंधनाच्या निर्यातीत सापडल्यामुळे अमेरिकेने सदर कंपनीवर मोठ्या कारवाईची शक्यता वर्तविली आहे.

तर अमेरिकेने काळ्या यादीत टाकलेल्या इराणी कंपन्यांच्या तीन अधिकार्‍यांवरही कारवाई केली. तर इंधनाच्या आड दहशतवाद्यांना निधी पुरविणार्‍या इराणवर परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी ताशेरे ओढले. ‘इराणने दहशतवाद्यांना निधी देण्यासाठी नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करणे थांबवावे आणि या क्षेत्रातील विध्वंस थांबवावा’, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी यावेळी दिला. तसेच यापुढे अमेरिकेची ही कारवाई सुरू राहील, असा इशारा पॉम्पिओ यांनी दिला. अमेरिकेचे इराणवरील हे निर्बंध म्हणजे आखातातील शांती व सुरक्षेसाठी केलेले प्रयत्न असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेच्या या निर्बंधांना आपण भीत नसल्याचे इराणने म्हटले आहे. अमेरिकेने इराणवर कितीही कठोर निर्बंध लादले तरी इराणची शस्त्रनिर्मिती सुरू राहणार असल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिकेचे निर्बंध इराणला शस्त्रसज्ज होण्यापासून रोखू शकत नसल्याचा दावा इराणने केला. २०१८ साली इराणबरोबरचा अणुकरार मोडीत काढल्यानंतर अमेरिकेने इराणवर निर्बंध लादणे सुरू ठेवले आहे. आण्विक आणि क्षेपणास्त्र निर्मिती करुन इराण निर्बंधांचे उल्लंघन करीत असून इतर देशांनीही इराणवरील या निर्बंधांना समर्थन द्यावे, असे आवाहन अमेरिकेने केले होते. पण राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने अमेरिकेचे सदर आवाहन फेटाळल्यानंतर अमेरिकेने इराणवर ‘स्‍नॅप बॅक’ निर्बंधांचा इशारा दिला होता.

leave a reply