अमेरिकेतील औद्योगिक क्षेत्राला उभारी देण्यासाठी तैवानच्या ‘सेमीकंडक्टर’ उद्योगाचा आदर्श ठेवायला हवा

- अमेरिकी अर्थतज्ज्ञाचा सल्ला

‘सेमीकंडक्टर’वॉशिंग्टन/तैपेई – तैवानने तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘सेमीकंडक्टर’ उद्योगात मिळवलेली आघाडी व त्यासाठी आखलेले धोरण उल्लेखनीय असून अमेरिकेतील औद्योगिक क्षेत्राला उभारी देण्यासाठी याचा आदर्श ठेवावा, असा सल्ला अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ जेफ फेरी यांनी दिला आहे. फक्त वित्त क्षेत्रातील व्यवसायांवर लक्ष केंद्रित केल्याने अमेरिकेची पिछेहाट झाली असून, आर्थिक पाया भक्कम करण्यासाठी तैवानप्रमाणे उत्पादन क्षेत्र बळकट करण्यावर भर द्यायला हवा, असेही फेरी यांनी बजावले.

काही दिवसांपूर्वीच तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी, प्रगत तंत्रज्ञानासाठी महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या ‘सेमीकंडक्टर’ क्षेत्रात अमेरिकेसह इतर देशांशी सहकार्य वाढविण्याचा प्रस्ताव दिला होता. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी अर्थतज्ज्ञाचा सल्ला लक्ष वेधून घेणारा ठरतो.

‘सेमीकंडक्टर’संरक्षण, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक गाड्या या उद्योगांमध्ये सेमीकंडक्टर हा निर्णायक घटक आहे. गेल्या वर्षभरात चीन व आंतरराष्ट्रीय समुदायामधील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीनकडून होणाऱ्या उत्पादन तसेच पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे इतर क्षेत्रांच्या पुरवठा साखळीलाही धक्का बसला असून काही आघाडीच्या कंपन्यांवर उत्पादन थांबविण्याची तसेच पुढे ढकलण्याची वेळ ओढावल्याचे समोर आले होते.

या पार्श्‍वभूमीवर, सेमीकंडक्टर उत्पादनातील आघाडीचा देश मानल्या जाणाऱ्या तैवानने अमेरिकेसह इतर देशांबरोबर आघाडी उघडून चीनला शह देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अर्थतज्ज्ञ फेरी यांनी अमेरिकेच्या पिछेहाटिचा मुद्दा उपस्थित करताना देशातील ‘चायना लॉबी’ला लक्ष्य केले.

‘सेमीकंडक्टर’

चिनी आयातीवर लावलेल्या करातून अमेरिकेच्या उद्योगक्षेत्राला दीर्घकालिन लाभ मिळणार असतानाही, सिलिकॉन व्हॅली व वॉशिंग्टमधील काही गट कर उठविण्याची मागणी करीत आहेत, याकडे अर्थतज्ज्ञ फेरी यांनी लक्ष वेधले. लगेच मिळणाऱ्या कॉर्पोरेट फायद्यासाठी अशा मागण्या करणाऱ्या कंपन्यांच्या मानेवर बसून, अमेरिकेला चीनवर अवलंबून रहायचे नाही हे सुनवायला हवे, अशी आग्रही भूमिका अमेरिकी अर्थतज्ज्ञांनी मांडली.

अमेरिका व चीनची दीर्घकालिन धोरणे तसेच उद्दिष्टे वेगवेगळी असून चीनमधील एकाधिकारशाही राजवट पहाता, अमेरिकेने चिनी अर्थव्यवस्थेपासून लांब राहिलेलेच योग्य ठरेल असेही फेरी यांनी बजावले. सेमीकंडक्टर क्षेत्रात आघाडी मिळविण्यासाठी अमेरिकी कंपन्यांनी उत्पादन आशियाई देशांकडून करून घेण्याऐवजी आपली उत्पादनक्षमता वाढवायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला. सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रगतीसाठी तैवानने आखलेल्या औद्योगिक धोरणाचा तसेच शिक्षणव्यवस्थेचा दाखलाही फेरी यांनी यावेळी दिला. अमेरिकेतील तरुणांनाही विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणिताच्या अभ्यासाकडे वळविण्याची आवश्‍यकता असल्याचे अर्थतज्ज्ञ फेरी म्हणाले.

leave a reply