अमेरिका-इस्रायल सहकार्य अभेद्य तटबंदीत सुरक्षित

- अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी

जेरुसलेम – ‘अमेरिका आणि इस्रायलमधील सुरक्षा सहकार्य अभेद्य तटबंदीत सुरक्षित आहे. इराणने या क्षेत्रात उभा केलेला दहशतवाद आणि आण्विक हालचालीं विरोधातही अमेरिका व इस्रायल एकजुटीने लढा देत आहे. इराणच्या अणुकार्यक्रमापासून सार्‍या जगाला धोका आहे’, अशा शब्दात अमेरिकन लोकप्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी इस्रायलला आश्‍वस्त केले. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाकडून इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी वेगाने पावले टाकत असताना पेलोसी यांनी इस्रायलला भेट दिल्याचे दिसत आहे.

ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे गेल्या आठ महिन्यांपासून इराण आणि युरोपिय देशांमध्ये अणुकरारावर वाटाघाटी सुरू आहेत. इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी बायडेन प्रशासनाने काही प्रस्ताव दिले असून येत्या काही दिवसांमध्ये सदर करार संपन्न होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. तर इस्रायलच्या राजनैतिक अधिकार्‍यांनी देखील मंगळवारी व्हिएन्नाला भेट दिल्याचे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे.

व्हिएन्ना येथील चर्चेत इस्रायल कुठल्याही प्रकारे सहभागी झालेला नाही. त्याचबरोबर इराणला अणुबॉम्ब निर्मितीपासून न रोखू शकणारा अणुकरार आपल्याला मान्य नसल्याचे इस्रायलने याआधीच स्पष्ट केले होते. इराणला रोखण्यासाठी इस्रायल कुठल्याही करारामध्ये अडकणार नसल्याचे इस्रायली नेत्यांनी बजावले होते. अशा परिस्थितीत, इस्रायली राजनैतिक अधिकार्‍यांची व्हिएन्ना भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

बुधवारी दुपारी अमेरिकन लोकप्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी इस्रायलमध्ये दाखल झाल्या. पेलोसी या सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षाच्या वरिष्ठ सिनेटर असून त्यांच्याबरोबर डेमोक्रॅट पक्षाचे शिष्टमंडळही इस्रायल भेटीवर आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन इराणला अणुबॉम्बच्या निर्मितीपासून रोखण्यासाठी बांधिल असल्याचे पेलोसी म्हणाल्या.

‘परस्परांची सुरक्षा, आर्थिक हितसंबंध, समान मूल्ये आणि लोकशाहीशी असलेली बांधिलकी याबाबत अमेरिका आणि इस्रायलमधील संबंध अतूट आहेत’, असे पेलोसी यांनी इस्रायली संसदेतील भाषणात म्हटले. त्याचबरोबर पॅलेस्टाईनच्या निर्मितीबाबतही बायडेन प्रशासन वचनबद्ध असल्याची माहिती पेलोसी यांनी दिली. तसेच पॅलेस्टाईनचा रोखलेला निधी देखील लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा पेलोसी यांनी केली. यासाठी पेलोसी व इतर डेमोक्रॅट्स सदस्य पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांची भेट घेणार आहेत.

इराणबरोबरच्या आण्विक वाटाघाटी आणि पॅलेस्टाईनच्या मुद्यावर बायडेन प्रशासन व इस्रायल यांच्यात एकवाक्यता नसल्याचा दावा इस्रायली तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. बायडेन प्रशासनाने अणुकरारासाठी इराणला दिलेला प्रस्ताव आपल्याला मान्य नसल्याचे इस्रायलने स्पष्ट केले होते. अमेरिकेतील विरोधीपक्ष नेते देखील बायडेन प्रशासनाच्या निर्णयांचा विरोध करीत असून इस्रायलच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करीत आहेत.

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते लिंडसे ग्रॅहम यांनी इस्रायलला भेट देऊन पंतप्रधान नफ्ताली बेनेट, परराष्ट्रमंत्री येर लॅपिड, संरक्षणमंत्री बेनी गांत्झ तसेच माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांची भेट घेतली होती. इराणचा अणुकार्यक्रम रोखण्यासाठी ‘संरक्षक कडे’ उभारण्याची आवश्यकता असल्याचे ग्रॅहम यांनी म्हटले होते. तसेच कुठलाही करार इस्रायलला स्वसंरक्षणासाठीच्या कारवाईपासून रोखू शकत नसल्याच्या भूमिकेचे ग्रॅहम यांनी समर्थन केले होते. इस्रायलच्या नाशाचे प्रयत्न करणे म्हणजे अमेरिकेशी युद्ध पुकारल्यासारखेच ठरते, असे यावेळी ग्राहम यांनी बजावले होते. ग्राहम यांच्या या भेटीनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेनेट तातडीच्या बाहरिनचत्या दौर्‍यावर गेले होते, याकडे इस्रायली माध्यमे लक्ष वेधत आहेत.

दरम्यान, व्हिएन्ना येथील चर्चेत हा करार झाला तरीही इराणला अणुबॉम्ब निर्मितीपासून रोखू शकत नसल्याचे दावे बायडेन प्रशासनाचे अधिकारीच करीत आहेत. संभाव्य करारानंतरही इराण पुढील काही आठवड्यांमध्ये अणुबॉम्ब निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची जमवाजमव करू शकतो, असा दावा बायडेन प्रशासनाने नियुक्त केलेले अधिकारी रॉब मॅली आणि राष्ट्रीय सुरक्षा समितीचे दूत ब्रेट मॅगर्क यांनी केला होता.

leave a reply