अमेरिका-इस्रायलचे इराणबरोबर अपारंपरिक युद्ध भडकेल

- आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचा दावा

अपारंपरिक युद्धनिकोसिया – गेल्या नऊ महिन्यांपासून रशिया-युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धामुळे अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील तणावाकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र अमेरिका-इस्रायलचा इराणबरोबरील तणाव धोकादायक स्तरावर पोहोचला आहे. याने इराण आणि अमेरिका-इस्रायलमध्ये अपारंपरिक युद्ध पेट घेईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी दिला आहे.

इस्रायल इराणच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले चढविण्याचे इशारे दिले. तर इराणने देखील इस्रायलला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकण्याची धमकी दिली होती. इराण व इस्रायलमध्ये थेट पारंपरिक युद्ध भडकले तर त्याचे गंभीर परिणाम क्षेत्रीय सुरक्षेवर होतील, अशी चिंता आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी व्यक्त केली होती. पण इस्रायल व इराणमध्ये थेट युद्ध भडकण्याची शक्यता नाही, असा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी केला आहे.

अपारंपरिक युद्धयासाठी गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांचा दाखला या विश्लेषकांनी दिला. पाश्चिमात्य देश आणि इराणमधील अणुकरारावरील फिस्कटलेली चर्चा, युक्रेनच्या युद्धात इराणने रशियाला पुरविलेले ड्रोन्स आणि अडीच महिन्यांपासून इराणमध्ये भडकलेली निदर्शने, या तीन कारणांमुळे अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये अपारंपरिक युद्ध भडकेल, असे या विश्लेषकांचे म्हणणे आहे. यापैकी युक्रेन युद्धात इराणच्या ड्रोन्सनी केलेले नुकसान अमेरिका व युरोपिय देशांसाठी आव्हान ठरत आहे. 20 हजार डॉलर्सचे ड्रोन्स भेदण्यात चार ते 12 लाख डॉलर्सचे इंटसेप्टर अपयशी ठरत आहेत. त्यामुळे इराणबरोबर थेट युद्ध पुकारण्यापेक्षा अप्रत्यक्ष संघर्ष करण्यावर अमेरिका विचार करीत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. या अपारंपरिक संघर्षामध्ये हिंसक निदर्शने, छुपे युद्ध किंवा सायबर हल्ल्यांचा समावेश असू शकतो, असा दावा आखातातील विश्लेषकांनी केला आहे.

सिरियातील हल्ले थांबविण्यासाठी रशियाचे इस्रायलला आवाहन

अपारंपरिक युद्धमॉस्को – युक्रेनमधील युद्धासाठी रशियाने सिरियातील आपले लष्कर कपात करण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी इस्रायलने सिरियात हल्ले चढवू नये, असे आवाहन रशियाने केले आहे. रशिया व इस्रायलच्या अधिकाऱ्यांमध्ये याबाबत चर्चा पार पडल्याचा दावा इस्रायली रेडिओ वाहिनीने केला.

रशियाचे युक्रेनशी युद्ध सुरू असताना इस्रायलने युक्रेनला लष्करी सहाय्य पुरवू नये, असे आवाहन रशियाने केले होते. तर इस्रायलने आपल्याकडून युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरविली जात नसल्याचा दावा केला होता. पण इस्रायली बनावटीची चिलखती वाहने युक्रेनचे जवान वापरत असल्याचे उघड झाले होते. यामुळे रशिया व इस्रायलमध्ये तणाव निर्माण झाला होता.

पण इस्रायलमध्ये बेंजामिन नेत्यान्याहू यांचे सरकार सत्तेवर येत असून नेत्यान्याहू आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर रशिया इस्रायलला हे आवाहन करीत असल्याचे दिसते. त्याला इस्रायलकडून प्रतिसाद मिळण्याची दाट शक्यता आहे.

हिंदी

leave a reply