अमेरिका-जपान-दक्षिण कोरियाचे उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांवर नवे निर्बंध

us japan korea flagsवॉशिंग्टन/सेऊल – गेल्या काही दिवसांपासून क्षेपणास्त्र चाचण्यांचा धडाका लावणाऱ्या उत्तर कोरियावर अमेरिका, जपान व दक्षिण कोरियाने नवे निर्बंध लादले आहेत. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्या या क्षेत्रासह जागतिक सुरक्षेसाठी धोका ठरतात, अशी टीका करून अमेरिका व मित्रदेशांनी ही निर्बंधांची कारवाई केली. काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांनी अमेरिकेवर अणुबॉम्बचा हल्ला चढविण्याची धमकी दिली होती.

याआधीच उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्या घेऊन या क्षेत्रात तणाव निर्माण केला आहे. यानंतर लवकरच उत्तर कोरिया अणुचाचणी घेऊ शकतो. यासाठी आवश्यक ती तयारी उत्तर कोरियाने पूर्ण केल्याचा दावा दक्षिण कोरियन माध्यमे करीत आहेत. उत्तर कोरियाकडे सध्या ४५ ते ५५ अणुबॉम्बची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान व साहित्य आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अणुकार्यक्रम राबविणारा उत्तर कोरिया येत्या काळात आपल्या आण्विक क्षमतेत वाढ करील, असे इशारे आंतरराष्ट्रीय विश्लेषक देत आहेत.

us japan korea flagकाही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाच्या हुकूमशहांनी देशाला आण्विक शक्ती बनविण्याची घोषणा केली होती. उत्तर कोरियाच्या नेतृत्वाने याचे तपशील उघड केलेले नाहीत. पण येत्या दशकाच्या अखेरीपर्यंत उत्तर कोरियाकडे किमान २०० अणुबॉम्ब असतील, यादिशेने हुकूमशहा किम जाँग-उन यांचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जातो. असे झाले तर उत्तर कोरिया ब्रिटन, फ्रान्स व चीनच्या स्पर्धेत सामील होईल, याकडे आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्ष वेधत आहेत. अणुबॉम्ब निर्मितीच्या दिशेने उत्तर कोरियाचे सुरू असलेले हे प्रयत्न दक्षिण कोरिया व जपान या अमेरिकेच्या मित्रदेशांची सुरक्षा धोक्यात टाकणारी आहेत.

अशा परिस्थितीत, अमेरिकेने उत्तर कोरियाविरोधी कठोर कारवाई करावी, अशी मागणी अमेरिकेतील प्रसिद्ध अभ्यासगट व विश्लेषक करीत आहेत. पण गेल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात बायडेन प्रशासन उत्तर कोरियाविरोधात कठोर भूमिका स्वीकारण्यात अपयशी ठरल्याची टीका अमेरिकेतून होत आहे.

leave a reply