चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका – न्यूझीलंड सहकार्य वाढविणार

वेलिंग्टन – इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या आक्रमक हालचालींमुळे तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिका आणि न्यूझीलंडमध्ये संरक्षणविषयक सहकार्य वाढविण्यावर एकमत झाले. अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडच्या प्रमुखांनी न्यूझीलंडचा दौरा करून याबाबत चर्चा केली.

US- New-Zealandगेल्या महिन्यात चीनने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील छोट्या बेटदेशांबरोबर विशेष सहकार्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. सॉलोमन आयलँड्स सारख्या बेटदेशांनी चीनसोबत हे सहकार्य प्रस्थापित केल्यानंतर ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडने यावर आक्षेप घेतला होता. या क्षेत्रातील चीनची लष्करी गुंतवणूक आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे या दोन्ही देशांनी म्हटले होते. यानंतर अमेरिकेने देखील या क्षेत्रातील बेटदेशांच्या भेटीसाठी आपले विशेषदूत रवाना केले होते.

अशा परिस्थितीत, अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे प्रमुख ॲडमिरल जॉन ॲक्विलिनो सोमवारी न्यूझीलंडमध्ये दाखल झाले. न्यूझीलंडचे संरक्षणदलप्रमुख एअर मार्शल केव्हिन शॉर्ट यांनी ॲडमिरल ॲक्विलिनो यांच्याबरोबर चर्चा केली. यामध्ये अमेरिका व न्यूझीलंडमधील संरक्षण सहकार्य विस्तारण्यावर एकमत झाल्याचे समोर येत आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांती व समृद्धी सुरक्षित ठेवण्यासाठी हे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे ॲक्विलिनो म्हणाले.

दरम्यान, न्यूझीलंडच्या भेटीवर असलेल्या अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडच्या प्रमुखांनी यानिमित्ताने चीनला इशारा दिला. ‘अमेरिका हा पॅसिफिक देश आहे. त्यामुळे तुम्ही कितीही काहीही केले तरी अमेरिका या क्षेत्रात कायम असेल’, असे ॲक्विलिनो यांनी बजावले.

leave a reply