अमेरिकेचे अण्वस्त्रवाहू स्टेल्थ ड्रोन बॉम्बर विमान तैनातीसाठी सज्ज

स्टेल्थ ड्रोन बॉम्बरकॅलिफोर्निया – जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात हल्ला चढविण्याची क्षमता असलेले स्टेल्थ ड्रोन बॉम्बर ‘बी-२१ रेडर’ तैनातीसाठी सज्ज असल्याची घोषणा अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी केली. अमेरिकेच्या संरक्षणदलांमध्ये तैनात कुठल्याही बॉम्बर विमानापेक्षा अधिक अत्याधुनिक क्षमता बी-२१मध्ये असल्याचा दावा संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी केला. एकाचवेळी अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता या बॉम्बरमध्ये असल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी दिली.

अमेरिकेचे संरक्षणदल लांब पल्ल्याचे आण्विक स्फोटके वाहून नेणारे ‘बी-५२ स्ट्रॅटोफोर्टस’ तर ‘बी-१’ लान्सर आणि ‘बी-२ स्पिरीट’ या बॉम्बर्सनी सज्ज आहे. यापैकी बी-१ सुपरसोनिक तर बी-२ हे स्टेल्थ बॉम्बर आहेत. गेल्या तीन ते चार दशकांपासून अमेरिकेच्या संरक्षणदलामध्ये ही बॉम्बर विमाने तैनात आहेत. पण या बॉम्बर विमानांवर कुरघोडी करणाऱ्या ‘बी-२१’ या स्टेल्थ बॉम्बर विमानाची निर्मिती केल्याचा दावा संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी केला.

‘बी-२१’ विमान अमेरिकेच्या हवाई सुरक्षेत मोठी वाढ करणारा ठरेल, असेही ऑस्टिन म्हणाले. गेली काही वर्षे या विमानाच्या निर्मितीबाबत गोपनीयता राखण्यात आली होती. शुक्रवारी कॅलिफोर्निया येथील कार्यक्रमात बी-२१ बॉम्बर जगासमोर उघड केले. पण अमेरिकेचे संरक्षणमंत्री किंवा पेंटॅगॉनने या विमानाची वैशिष्ट्ये उघड करयाचे टाळले. सदर बॉम्बरची निर्मिती करणाऱ्या ‘नॉर्थरॉप ग्रूमन’ या कंपनीने देखील या विमानाबाबत अधिक बोलण्यास नकार दिला.

मात्र जगभरातील इतर लांब पल्ल्याच्या बॉम्बर विमानांप्रमाणे बी-२१साठी वैमानिकाची आवश्यकता नाही. अमेरिकेच्या लष्करी तळावर बसलेला वैमानिक या स्टेल्थ बॉम्बरला जगभरात कुठेही मोहिमेसाठी तैनात करून कारवाई करू शकतो, अशी माहिती अमेरिकी कंपनीने दिली. याआधीच्या बॉम्बर विमानांमध्ये अण्वस्त्रे किंवा क्षेपणास्त्रेच तैनात करता येत होती. पण अत्याधुनिक बी-२१मध्ये एकाचवेळी अण्वस्त्रे तसेच मध्यम व लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रेही तैनात केली जाऊ शकतात.

दरम्यान, अमेरिकेच्या संरक्षणदलांनी अशी १०० बॉम्बर विमाने तैनात करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सदर बॉम्बर विमान रशिया व चीनसाठी इशारा असल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत.

हिंदी

leave a reply