चीनच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून अमेरिकी संसदेचे अध्यक्ष तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार

वॉशिंग्टन – येत्या काही तासात आपण तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांची नक्की भेट घेणार असल्याची घोषणा अमेरिकन प्रतिनिधीगृहाचे सभापती केवीन मॅकार्थी यांनी केली. याद्वारे गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेला गंभीर परिणामांच्या धमक्या देणाऱ्या चीनला मॅकार्थी यांनी उत्तर दिल्याचे दिसत आहे. याची आधीच कल्पना आलेल्या चीनने अमेरिकेवर आगपाखड सुरू केली आहे.

चीनच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून अमेरिकी संसदेचे अध्यक्ष तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेणारमध्य अमेरिकेतील ग्वातेमाला आणि बेलीझ या देशांच्या दौऱ्यावर असलेल्या तैवानच्या राष्ट्राध्यक्षा इंग-वेन बुधवारी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये दाखल होतील. तैवानला परतण्याआधी राष्ट्राध्यक्षा इंग-वेन अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींची भेट घेणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यामुळे संतापलेल्या चीनने गेल्या आठवड्याभरात तीन वेळा अमेरिकेला ही भेट टाळण्याचे बजावले होते. तसेच आपली मागणी अमान्य केल्यास आणि वन चायना पॉलिसीचे उल्लंघन केल्यास, अमेरिकेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी चीनने दिली होती.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून स्पाय बलून्स, झिंजियांग प्रांतातील उघूरवंशियांवरील अत्याचार, मानवी अवयवांची तस्करीच्या मुद्यावरुन अमेरिकन प्रतिनिधीगृहाने चीनविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. त्याचबरोबर बायडेन प्रशासनाने याप्रकरणी चीनवर दडपण वाढवावे, अशी मागणी प्रतिनिधीगृहाकडून केली जात आहे. अशा परिस्थितीत सभापती मॅकार्थी यांची तैवानच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरची भेट चीनला चिथावणारी आणि बायडेन प्रशासनाची कोंडी करणारी ठरू शकते.

leave a reply