अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून 9/11 दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील गोपनीय कागदपत्रे उघड करण्याचे आदेश

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षवॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, 9/11च्या दहशतवादी हल्ल्यात सौदी अरेबियाचा सहभाग असल्यासंदर्भात अमेरिकेकडे असलेली कागदपत्रे उघड करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आठवड्यात अमेरिकेतील 9/11च्या हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांनी अमेरिकेकडे असलेली माहिती उघड करणार नसाल, तर हल्ल्याच्या स्मृतिस्थळांनाही भेट देऊ नकात, असा खरमरीत इशारा बायडेन यांना दिला होता. त्यानंतर कागदपत्रे उघड करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी शुक्रवारी वटहुकुमावर स्वाक्षरी केली असून, त्यात न्याय विभागाला 9/11 हल्ल्यासंदर्भातील कागदपत्रे खुली करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रचार करीत असताना 9/11च्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील कागदपत्रे उघड करण्याचे वचन दिले होते. हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण होत असताना मी हे वचन पूर्ण करीत आहे’, या शब्दात बायडेन यांनी गोपनीय कागदपत्रे खुली करण्याबाबत आदेश दिल्याचे जाहीर केले.

यातली काही कागदपत्रे 11 सप्टेंबरला प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले असून, उर्वरित कागदपत्रांसाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यातही न्याय विभाग पुनरावलोकन करून कागदपत्रे प्रसिद्ध करील, असे सांगण्यात आले आहे. 9/11 हल्ल्यांशी संबंधित कुटुंबियांच्या गटाने बायडेन यांच्या आदेशावर समाधान व्यक्त केले असले, तरी कागदपत्रे व माहिती प्रसिद्ध होण्याबाबत शंका व्यक्त केली आहे. यापूर्वीच्या प्रशासनाने अखेरच्या क्षणी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून कागदपत्रे प्रसिद्ध करण्यास नकार दिला होता, याकडे काही कुटुंबियांनी लक्ष वेधले.

2016 साली अमेरिकेच्या संसदेने ‘द जस्टिस अगेन्स्ट स्पॉन्सर्स ऑफ टेररिझम’(जास्टा) हा कायदा मंजूर केला होता. त्यानुसार, अमेरिकी नागरिकांना हल्ल्याचे सूत्रधार व त्यात सहभागी असणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा अधिकार मिळाला आहे. या कायद्याच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकी तपासयंत्रणा ‘एफबीआय’ने केलेल्या चौकशीत सौदीचे नागरिक व अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश असल्याचे मानले जाते. ही माहिती उघड व्हावी, अशी मागणी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. पण याबाबत जारी करण्यात आलेल्या आदेशात सौदीचा उल्लेख नाही.

मार्च महिन्यात बायडेन प्रशासनाने ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येसंदर्भातील गुप्तचर यंत्रणांचा अहवाल प्रसिद्ध केला होता. यावेळी अहवालात सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा उल्लेख करण्यात आला होता. या अहवालानंतर, 9/11 हल्ल्यांशी संबंधित कुटुंबियांच्या गटांनी बायडेन प्रशासनावर 9/11 संदर्भात अधिकच दडपण आणण्यास सुरुवात केली होती. ‘जर राष्ट्राध्यक्ष बायडेन आपल्या वचनापासून ढळले आणि त्यांनी सौदीची बाजू घेतली, तर आम्ही 9/11च्या स्मृतिस्थळांवर बायडेन व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांविरोधात ठामपणे उभे राहून विरोध करु’, असे बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या गटाने बजावले होते.

9/11च्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील कायदेशीर कारवाईच्या मुद्यावरून अमेरिका व सौदी अरेबियात तणावही निर्माण झाला असून, सौदीने 9/11 हल्ल्याशी आपला संबंध असल्याचे आरोप फेटाळले आहेत.

leave a reply