कोरोनाच्या मुद्यावर अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांची भारतासह मित्रदेशांशी चर्चा

- इस्रायल, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया व ब्राझीलचाही समावेश

कोरोना, अमेरिका, माईक पॉम्पिओ

वॉशिंग्टन – जगभरात कोरोनाव्हायरस साथीच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असतानाच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी भारतासह इतर मित्रदेशांशी चर्चा केली. या चर्चेत इस्रायल, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया व ब्राझीलचा समावेश होता, अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मॉर्गन ओर्टागस यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन माल्का यांनी, इस्रायल-भारत यांच्यातील कोरोनाविषयक सहकार्यातून लवकरच जगासाठी एक चांगली बातमी मिळेल, असे संकेत दिले आहेत.

चीनमधून सुरू झालेल्या कोरोना साथीचा जगभरातील प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला साथ रोखून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जगातील प्रमुख देशांची धडपड सुरू आहे. कोरोनाची चाचणी, उपचार व लस यासाठी जगातील अनेक देश एकत्र आले असून या आघाडीत भारताचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. अमेरिका, इस्रायल, ब्रिटन या प्रमुख देशांनी कोरोनासंबंधित संशोधनासाठी भारताचे सहकार्य घेतले आहे.

Corona

‘अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ व इतर देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये कोरोना साथीला तोंड देण्यासाठी मित्रदेशांमध्ये उत्तम समन्वय हवा, यावर बोलणी झाली. साथीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थांना चालना देण्यासाठी व चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी सहकार्य अधिक दृढ करायला हवे. भविष्यातील आजारांच्या साथी टाळण्यासाठीही प्रयत्न सुरू करायला हवेत, यावर अमेरिकी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी भर दिला’, या शब्दात प्रवक्त्या ओर्टागस यांनी अमेरिका व मित्रदेशांमधील चर्चेची माहिती दिली.

Corona Meeting

चीनमधून सुरु झालेल्या कोरोनव्हायरस साथीचा सर्वात मोठा फटका अमेरिकेला बसला आहे. त्यामुळे अमेरिकी नेतृत्वाने सर्वच पातळ्यांवर चीनविरोधात आघाडी उघडली असून त्यासाठी मित्रदेशांकडूनही सहकार्य घेण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका यात सातत्याने भारताबरोबरील सहकार्याचा दाखला देत आहे. अमेरिकेत साथीचा फैलाव वाढल्यानंतर ट्रम्प यांनी भारताकडे साथीवर प्रभावी ठरणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाची मागणी केली होती. भारताने अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर या औषधांचा पुरवठाही केला होता. त्यापाठोपाठ कोरोनावरील लस विकसित करण्यासाठीही अमेरिकेने भारतीय कंपन्यांचे सहकार्य घेतले होते.गेल्याच महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कोरोनाच्या मुद्यावर भारताबरोबरील वाढत्या सहकार्याबाबत वक्तव्य केले होते.

Corona Discussionsअमेरिकेबरोबरच इस्रायलनेही कोरोनाविरोधातील मोहिमेसाठी भारताचे सहकार्य घेतले असून राजदूत रॉन माल्का यांचे वक्तव्य त्याचे महत्त्व अधोरेखित करणारे ठरते. ‘कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर भारत व इस्रायलमधील सहकार्य अधिकच दृढ झाले आहे. दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये यावर सातत्याने संवाद होत असून माहितीची देवाणघेवाण सुरू आहे. इस्रायलचा संरक्षण विभाग व भारतीय संरक्षण संशोधन संस्थेत कोरोनाच्या चाचण्यांबाबत एकत्रितरित्या काम सुरू असून लवकरच जगासाठी एक चांगली बातमी मिळू शकते’, असे माल्का यांनी सांगितले.

इस्रायलच्या संरक्षण विभागाशी निगडित प्रयोगशाळेने कोरोनव्हायरस विरोधात तीन ‘अँटीबॉडीज’ विकसित करण्यात यश मिळवले आहे. हे संशोधन कोरोनाविरोधात सुरू असणाऱ्या मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. इस्रायलने हे संशोधन भारताशी शेअर करण्याची ग्वाही दिली होती.

leave a reply