डॅनिअल पर्ल यांच्या हत्येप्रकरणी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानवरील दडपण वाढविले

वॉशिंग्टन – २००२ साली पाकिस्तानात हत्या झालेले अमेरिकेचे पत्रकार डॅनिअल पर्ल यांच्या कुटुंबियांना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी आश्‍वस्त केले आहे. पर्ल यांचे अपहरण करून हत्या घडविणार्‍यांना सजा दिल्याखेरीज अमेरिका स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी पर्ल यांच्या कुटुंबियांना दिली. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी ही माहिती दिली. हा अमेरिकेने पाकिस्तानला दिलेला आणखी एक इशारा असल्याचे समोर येत आहे. बायडेन प्रशासन सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानला एकामागोमाग एक धक्के देत आहे. हा योगायोग नसून त्यामागे फार मोठी व्यूहरचना असल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराचे माजी अधिकारी व सामरिक विश्‍लेषक करीत आहेत.

अमेरिकेचे आधीचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यापेक्षा आत्ताचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची धोरणे वेगळी असतील. बायडेन काश्मीर प्रश्‍नावर पाकिस्तानची बाजू उचलून धरतील आणि भारतावर दडपण वाढवतील, असा समज पाकिस्तानात रूढ झाला होता. पण प्रत्यक्षात बायडेन प्रशासनाने याच्या उलट भूमिका घेतल्याचे दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष पदावर आल्यानंतर बायडेन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा करण्याची तसदी घेतलेली नाही. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी भारताचा दौरा केला आणि त्यानंतर अफगाणिस्तानलाही भेट दिली. पण ते पाकिस्तानात आले नाहीत, अशी तक्रार पाकिस्तानकडून केली जात आहे.

इतकेच नाही तर २२ ते २३ एप्रिल रोजी होणार्‍या जागतिक पर्यावरणविषयक परिषदेसाठी अमेरिकेने पाकिस्तानला आमंत्रण दिलेले नाही. या परिषदेला भारत उपस्थित असेल, पण पाकिस्तानला यातून वगळण्यात आल्याची खंत पंतप्रधान इम्रान?खान व्यक्त करीत आहेत. याबाबतच्या बातम्या येत असतानाच, डॅनिअल पर्ल यांच्या कुटुंबियांशी बोलून अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानवरील दडपण प्रचंड प्रमाणात वाढविल्याचे दिसत आहे. २००२ साली डॅनिअल पर्ल पाकिस्तानात आले होते. पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ व अल कायदा या दहशतवादी संघटनेचे लागेबांधे असल्याचे सिद्ध करणार्‍या बातमीवर पर्ल काम करीत होते. त्यांच्या हाती महत्त्वाचा सुगावा लागल्यानंतर पर्ल यांचे अपहरण करण्यात आले व त्यानंतर त्यांची निघृण हत्या झाली.

पर्ल यांची हत्या घडविणारा दहशतवादी अहमद उमर सईद शेख याची पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच सुटका केली होती. त्यावर अमेरिकेत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी पर्ल यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे पुढच्या काळात अमेरिका या प्रश्‍नावर पाकिस्तानवरील दबाव प्रचंड प्रमाणात वाढविणार असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

बायडेन प्रशासनाच्या या पाकिस्तानविरोधी धोरणामागे निराळीच कारणे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तालिबानबरोबर गेल्या वर्षी केलेल्या करारानुसार अमेरिका १ मे च्या आधी अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेणार होती. पण ही सैन्यमाघार शक्य नसल्याचा निर्वाळा अमेरिकेने दिला आहे. यामुळे खवळलेल्या तालिबानने घनघोर संघर्षाची धमकी दिली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेला अफगाणिस्तानात पाकिस्तानकडून काही ‘डर्टी वर्क’ करून घ्यायचे आहे. हे काम पाकिस्तानला टाळता येणार नाही, यासाठी बायडेन प्रशासनाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे, असा दावा पाकिस्तानी लष्कराच्या काही माजी अधिकार्‍यांनी केला आहे.

अमेरिकेला पाकिस्तानकडून अपेक्षित असलेले हे ‘डर्टी वर्क’ कोणते, याचे तपशील पाकिस्तानी लष्कराच्या माजी अधिकार्‍यांनी दिलेले नाहीत. पण अमेरिका व तालिबानमध्ये घनघोर संघर्ष पेटल्यानंतर त्याच्या ज्वाला पाकिस्तानलाही होरपळून टाकतील, असे संकेत आत्तापासूनच मिळू लागले आहेत. याचीच धग पाकिस्तानला जाणवत आहे. मात्र या देशाच्या लष्करी अधिकार्‍यांनी केलेल्या दाव्यानुसार अमेरिका सांगत असलेेले डर्टी वर्क करण्यासाठी पाकिस्तान तयार झाला, तर मात्र अमेरिकेचे या देशाबाबतचे धोरण बदलेल, ही नवी शक्यता यामुळे समोर येत आहे.

leave a reply