भारत-चीन सीमावादात अमेरिकेने पडू नये

- चीनच्या संरक्षण मंत्रालयाची अमेरिकेवर टीका

बीजिंग – भारत आणि चीन सीमावादावर चर्चा करीत आहेत. त्यात अमेरिकेने नाक खुपसण्याचे कारण नाही, असे चीनने अमेरिकेला बजावले आहे. भारत आणि चीनमधील सीमावादावर अमेरिकेने दिलेल्या प्रतिक्रियेवर हल्ला चढविताना चीनच्या संरक्षण मंत्रालयाने हा इशारा दिला. मात्र भारताबरोबरील सीमावाद चर्चेद्वारे सोडविण्याचे दावे करीत असताना, चीनने पाकिस्तानला भारताच्या विरोधात हॉवित्झर तोफा तसेच अत्याधुनिक ड्रोन्स पुरविण्याची तयारी केल्याच्याही बातम्या येत आहेत.

भारत-चीन सीमावादात अमेरिकेने पडू नये - चीनच्या संरक्षण मंत्रालयाची अमेरिकेवर टीकालडाखच्या एलएसीवरील सीमावाद सोडविण्यासाठी भारत व चीनच्या लष्करामध्ये आत्तापर्यंत चर्चेच्या १४ फेर्‍या पार पडल्या. या क्षेत्रातील तणाव काही प्रमाणात कमी करण्यात यश आले असले तरी इथला तणाव पूर्णपणे संपलेला नाही. भारताचे लष्करप्रमुख सातत्याने याची जाणीव करून देत असून भारत चीनच्या कुठल्याही आगळिकीला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे सांगत आहेत. तर चीन लडाखच्या सीमेवर हा तणाव कायम ठेवूनही भारत व चीन व्यापार तसेच अन्य आघाड्यांवर सहकार्य कायम ठेवू शकतात, असे चीनचे म्हणणे आहे. मात्र भारताने चीनचा हा प्रस्ताव धुडकावून लावला. सीमेवर हजारो जवान तैनात ठेवून चीनला भारताकडून व्यापारी तसेच इतर आघाड्यांवरील संबंध सुरळीत राहतील, अशी अपेक्षा ठेवता येणार नाही, याची जाणीव भारताच्या नेत्यांनी करून दिली होती.

यानंतरच्या काळातही चीनने भारतावरील लष्करी दडपण वाढविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यासाठी चीनने प्रचारयुद्धाचाही वापर केला. एलएसीवर चीनचे लष्कर वर्चस्व गाजवित असल्याचा आभास निर्माण करून चीनच्या लष्कराने तसे दावे ठोकले होते. पण या प्रचारयुद्धाचा भारतावर विशेष परिणाम झाला नाही. भारतीय लष्कराने वेळोवेळी अचूक माहिती प्रसिद्ध करून चीनच्या प्रचारयुद्धाची हवा काढून घेतली होती. भारतावर दबाव टाकण्याचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत, हे लक्षात घेऊन आता चीनने आपल्या पवित्र्यात बदल केल्याचे संकेत मिळत आहेत.

भारत-चीन सीमावादात नाक खुपसू नका, हा चीनच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेला दिलेला इशारा हा चीनच्या बदललेल्या पवित्र्याचा भाग असल्याचे संकेत मिळत आहेत. भारतावर दडपण टाकण्यात यश मिळत नाही, हे पाहून चीनने आता भारताबरोबर जुळवून घेण्याची तयारी केली असावी, असा दावा काही विश्‍लेषक करीत आहेत. मात्र या हालचाली करीत असताना, चीनने पाकिस्तानला हॉवित्झर तोफा, ड्रोन्स तसेच लढाऊ विमाने पुरविण्याची तयारी केल्याच्याही बातम्या समोर येत आहेत.

leave a reply