इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील स्थैर्यासाठी अमेरिकेचे भारताला सहाय्य

पेंटॅगॉनच्या अधिकाऱ्यांचा दावा

वॉशिंग्टन – इंडो-पॅसिफिक क्षेत्राला स्थैर्य प्रदान करण्यासाठी भारत फार मोठे योगदान देऊ शकतो. यासाठी अमेरिका भारताबरोबर भागीदारी विकसित करून भारताला सर्वतोपरी सहकार्य करीत असल्याचा दावा अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय असलेल्या पेंटॅगॉनच्या या वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या देशाकडून भारताला पुरविल्या जाणाऱ्या सहाय्याचे तपशील उघड केलेले नाहीत. मात्र अंतराळ, आर्टिफिशल इंटेलिजन्स व सायबर या आधुनिक काळातील युद्धाच्या आघाड्यांवर भारत व अमेरिका लक्षणीय सहकार्य करीत आहेत, असा दावा या अधिकाऱ्याने केला.

The_Pentagon,_cropped_squareपीटीआयला या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार भारत व अमेरिकेच्या संरक्षणदलांमध्ये सहकार्य व समन्वय वाढत चालला असून दोन्ही देशांमध्ये वाढत असलेले युद्धसराव याचा दाखला देत असल्याचे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. अमेरिकेकडून भारताबरोबर सहकार्य वाढविले जात आहे, त्यामागे निश्चित अशी भूमिका आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्राला स्थैर्य प्रदान करणारा देश म्हणून अमेरिका भारताकडे पाहतो. म्हणूनच भारत आपल्या संरक्षणदलांची क्षमता वाढविण्यासाठी, तसेच संरक्षणाच्या आघाडीवर आत्मनिर्भर बनण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना अमेरिकेचा पाठिंबा आहे, असा दावा या अधिकाऱ्याने केला. मात्र अमेरिका भारताला करीत असलेल्या सहकार्याचे तपशील या अधिकाऱ्याने उघड केलेले नाहीत.

भारत व अमेरिकेच्या लष्करामध्ये अधिक संवाद व समन्वय विकसित व्हावा, यासाठी योजनाबद्धरित्या प्रयत्न केले जात आहेतच. याच्या बरोबरीने भविष्यातील युद्धाच्या आघाड्या व तंत्रज्ञान म्हणून उदयाला येत असलेल्या अंतराळ, आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि सायबर क्षेत्राबाबतही भारत व अमेरिका सहकार्य वाढवत आहेत. ही बाब उत्साह वाढविणारी असल्याचे सांगून यावर सदर अधिकाऱ्याने समाधान व्यक्त केले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात भारत व अमेरिकेच्या लष्कराने केलेल्या भरीव सहाय्याचा उल्लेख देखील या अधिकाऱ्याने केला. याबरोबरच भारत व अमेरिकेचे ‘क्वाड’मधील सहकार्य सर्वात महत्त्वाचे ठरते, असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

क्वाडच्या माध्यमातून भारत व अमेरिका इतर आशियाई देशांना व बहुपक्षीय संघटनांना अधिक सहकार्य कसे करू शकतात, यावर विचार सुरू असल्याची माहिती पेंटॅगॉनच्या या अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान, पेंटॅगॉन तसेच अमेरिकी नौदलाच्या इंडो-पॅसिफिक कमांडच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने भारताबरोबरील सहकार्याला विशेष महत्त्व दिले जाते. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय व व्हाईट हाऊस देखील भारताबरोबरील संबंधांना सर्वाधिक महत्त्व असल्याचे दावे करीत आले आहे. मात्र सध्याच्या काळात अमेरिका भारताशी सहकार्य प्रस्थापित करण्याचे दावे करीत असताना, पाकिस्तानच्या हवाई दलाला पॅकेज पुरवित असल्याची बाब उघड झाली होती. त्यामुळे बायडेन प्रशासनाच्या हाती अमेरिकेची सत्ता असताना भारत अमेरिकेकडून केल्या जाणाऱ्या या दाव्यांकडे अतिशय सावधपणे पाहत असल्याचे दिसते.

leave a reply