अमेरिका व स्वीडनमध्ये संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या

संरक्षण सहकार्यवॉशिंग्टन – रशियाच्या युक्रेनमधील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर युरोपातील फिनलंड व स्वीडन या देशांनी नाटोत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भातील प्रक्रिया सुरू असतानाच नाटोचे सदस्य असलेल्या प्रमुख देशांकडून दोन्ही देशांबरोबरील संरक्षण सहकार्य भक्कम करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. अमेरिका व स्वीडनमध्ये नुकताच महत्त्वपूर्ण संरक्षणसहकार्य करार झाल्याची माहिती समोर आली. स्वीडिश वृत्तवाहिनी ‘एसव्हीटी’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले.

अमेरिकेचे लष्करप्रमुख जनरल जेम्स मॅक्कॉनव्हिले व स्वीडनचे लष्करप्रमुख जनरल कार्ल एन्जेलब्रेक्टसन यांच्यात झालेल्या बैठकीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा करार दोन देशांमधील सामरिक करार असल्याची माहिती स्विडिश अधिकाऱ्यांनी दिली. या करारात पुढील काळात दोन देशांमध्ये संयुक्त लष्करी सरावांचे आयोजन तसेच स्वीडनच्या सुरक्षेची हमी, अशा तरतुदींचा समावेश आहे. स्वीडन हा आर्क्टिक क्षेत्रानजिकचा देश असून आर्क्टिकच्या सुरक्षेसाठी स्वीडिश लष्कराचा अनुभव उपयुक्त ठरु शकेल, असा दावा अमेरिकी अधिकाऱ्यांनी केला. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने आर्क्टिक क्षेत्रासाठी नवे धोरण जाहीर केले होते.

त्यात या क्षेत्रातील देशांबरोबर संरक्षणसहकार्य वाढविण्याचे तसेच या भागात तैनाती वाढविण्याचे संकेत देण्यात आले होते. रशिया व चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आर्क्टिकमधील तैनाती वाढविणे महत्त्वाचे असल्याचा उल्लेख अमेरिकेच्या धोरणात करण्यात आला होता.

leave a reply