अण्वस्त्र प्रतिबंध कराराच्या तयारीत असलेल्या ऑस्ट्रेलियाला अमेरिकेचा इशारा

कॅनबेरा – ऑस्ट्रेलिया लवकरच अण्वस्त्रांची निर्मिती, चाचणी, वापर किंवा त्यांचा साठा करण्यावर पूर्णपणे बंदी टाकणार आहे. ऑस्ट्रेलियातील अँथनी अल्बानीज सरकार लवकरच याबाबतच्या करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या येत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या या लक्षवेधी निर्णयाचे न्यूझीलंडने स्वागत केले. पण यामुळे अस्वस्थ झालेल्या अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने ऑस्ट्रेलियालाच इशारा दिला आहे. अल्बानीज सरकारने या करारावर स्वाक्षरी केलीच, तर ऑस्ट्रेलिया न्यूक्लिअर अम्ब्रेलामधून वगळला जाईल आणि अमेरिका ऑस्ट्रेलियाची सुरक्षा करू शकणार नाही. याचा दोन्ही देशांमधील सुरक्षाविषयक सहकार्यावर परिणाम होईल, असे अमेरिकेने बजावले आहे.

biden albaneeseआतापर्यंत ऑस्ट्रेलियाचे संरक्षणविषयक धोरण अमेरिकेवर अवलंबून होते. शत्रूने हल्ला चढवलाच तर ऑस्ट्रेलियाची सुरक्षा करण्याची ग्वाही अमेरिकेने दिली होती. शीतयुद्धाच्या काळातच अमेरिकेने ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या दोन्ही देशांना ‘न्यूक्लिअर अम्ब्रेला’ अर्थात आण्विक सुरक्षा करारात सामील करून घेतले होते. सोव्हिएत रशियाच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी अमेरिकेने आपल्या सहकारी देशांना ही सुरक्षा पुरविली होती.

पुढील काही वर्षातच न्यूझीलंडने या करारातून माघार घेतली होती. अण्वस्त्र मुक्त जग या भूमिकेचा स्वीकार करून न्यूझीलंडच्या सरकारने अमेरिकेची अण्वस्त्रे किंवा अण्वस्त्रवाहू विमाने आणि युद्धनौका तैनात करण्यासही नकार दिला होता. पण ऑस्ट्रेलिया अमेरिकेबरोबरच्या करारात सामील होती. पण या वर्षाच्या सुरुवातीला आस्ट्रेलियाच्या सत्तेवर आलेल्या अँथनी अल्बानीज यांनी सुरक्षेच्या आघाडीवर स्वतंत्र धोरण स्वीकारले आहे.

अल्बानीज सरकारने अमेरिकेबरोबरच्या करारातून माघार घेण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या चीनबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे. तर अल्बानीज सरकारने ‘ट्रिटी ऑन दी प्रोहिबिशन ऑफ न्युक्लिअर वेपन्स’ अर्थात अण्वस्त्र प्रतिबंध करार करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने १९७० सालीच संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘नॉन प्रोलिफरेशन ट्रिटी-एनपीटी’ अर्थात अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केली आहे. पण सदर करार अण्वस्त्रांच्या पूर्ण वापरावर बंदी टाकणारा नसल्याचा दावा केला जातो.

अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘ट्रिटी ऑन द प्रोहिबिशन ऑफ न्यूक्लिअर वेपन्स’ या करारासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे न्यूझीलंडप्रमाणे ऑस्ट्रेलिया देखील अण्वस्त्रांची निर्मिती तसेच तैनाती देखील करू शकणार नाही. लवकरच ऑस्ट्रेलिया या करारावर स्वाक्षरी करील. पण अमेरिकेने ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने या करारावर स्वाक्षरी केली, तर हा देश अमेरिकेचे सहकार्य गमावून बसेल, याकडे ऑस्ट्रेलियातील अमेरिकन दूतावासाने लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षेसाठी अमेरिकेचे सहकार्य आवश्यक असताना ऑस्ट्रेलियाचा सदर निर्णय धोकादायक ठरेल. ऑस्ट्रेलिया अमेरिकेची न्यूक्लिअर अम्ब्रेला अर्थात आण्विक सुरक्षेची हमी गमावून बसेल, असा इशाराच अमेरिकेच्या दूतावासाने दिला आहे.

leave a reply