इराणबरोबरील वाटाघाटीतून बाहेर पडण्याचा अमेरिकेचा इशारा

- अमेरिका आखातात ड्रोन टास्क फोर्स उभारणार

बर्लिन/तेहरान – आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने इराणच्या अणुकार्यक्रमातील प्रगतीबाबत दिलेल्या धक्कादायक माहितीनंतर, अमेरिकेने इराणला इशारा दिला. ‘२०१५ सालच्या अणुकरारात इराणने सामील होण्याची वेळ निघून चालली असून लवकरच यासंबंधी सुरू असलेल्या वाटाघाटीतून अमेरिका माघार घेईल’, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी बजावले. त्याचबरोबर पर्शियन आखातातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी लवकरच ड्रोन टास्क फोर्स उभारणार असल्याची घोषणा अमेरिकेच्या ‘फिफ्थ फ्लिट’ने केली. सदर ड्रोन टास्क फोर्स इराणसंबंधी धोक्यावर नजर ठेवण्यासाठी असल्याचा दावा केला जातो.

गेल्या तीन महिन्यांमध्ये इराणने ६० टक्के क्षमतेच्या संवर्धित युरेनियमच्या साठ्यात मोठी वाढ केली आहे. इराणकडे या क्षमतेचा १० किलो युरेनियमचा साठा असल्याची धक्कादायक माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने दिली. त्याचबरोबर संवर्धित युरेनियमच्या अन्य क्षमतेच्या साठ्यांमध्येही इराणने वेगाने वाढ केल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. याशिवाय इराणने आपल्या अणुप्रकल्पाच्या निरिक्षणाची परवानगी दिली नसल्याचा आरोप आयोगाने केला.

इराणने यावर तीव्र संताप व्यक्त केला. तसेच अणुऊर्जा आयोगाच्या अहवालाला आव्हान देण्याची घोषणा केली. अणुकरारातील वाटाघाटींसाठी दबाव टाकणार्‍या अमेरिकेच्या बायडेन प्रशासनावर इराणने टीका केली. बायडेन प्रशासनाने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानसिकतेतून अणुकराराकडे पाहणे थांबविले नाही तर मोठे नुकसान होईल, असा इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

इराण आपल्या अणुकार्यक्रमाबाबत पूर्णपणे पारदर्शी असून अणुऊर्जा आयोगच आपल्या जबाबदारीत कमी पडत असल्याचा ठपका इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी ठेवला. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाची अशी भूमिका कायम राहिली तर त्याने अणुकरारावरील चर्चा बाधित होईल, असा इशारा रईसी यांनी दिला. त्याचबरोबर पुढील दोन महिने इराण अणुकरारात सहभागी होणार नसल्याचे राष्ट्राध्यक्ष रईसी म्हणाले.

यावर अमेरिकेची प्रतिक्रिया आली आहे. २०१५ सालच्या अणुकरारात इराणला सामील करून घेण्यासाठी ज्या काही सवलती दिल्या होत्या, त्याची मुदत संपत आहे. अमेरिका या वाटाघाटीत अधिक काळ सहभागी होऊ शकत नसल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी स्पष्ट केले. जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हैको मास यांनी देखील इराण या आघाडीवर करीत असलेल्या विलंबावर नाराजी व्यक्त केली. तर इराणने सामंजस्य आणि सहकार्याने अणुऊर्जा आयोगाच्या आक्षेपांचे निराकरण करावे, असे आवाहन रशियाने केले आहे.

दरम्यान, पर्शियन आखाताच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अमेरिकेच्या ‘फिफ्थ फ्लिट’ने बुधवारी महत्त्वाची घोषणा केली. पर्शियन आखात तसेच त्यापलिकडील क्षेत्रातील वाहतुकीच्या सुरक्षेसाठी अमेरिका लवकरच ड्रोन टास्क फोर्स उभारणार असल्याचे अमेरिकेच्या आरमाराने जाहीर केले. हवाई, सागरी तसेच समुद्राखालील टेहळणीची जबाबदारी या ड्रोन टास्क फोर्सवर असेल, अशी माहिती अमेरिकन आरमाराच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. पर्शियन आखातातील अमेरिकेच्या या ड्रोन टास्क फोर्सची तैनाती इराणला इशारा देण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे.

leave a reply