तालिबानमधील उझबेक गटाचा काबुलमधील नेत्यांना इशारा

उझबेक गटाचामेमाना – ‘तालिबानच्या नेतृत्वाने आमच्या कमांडरची सुटका करून दिली नाही तर यापुढे कधीही फरयाब प्रांतात तालिबानचा झेंडा फडकू देणार नाही’, असा इशारा तालिबानमधील उझबेक गटाच्या उपप्रमुखाने दिला. तालिबानने काबुलचा ताबा घेऊन पाच महिने पूर्ण होत असताना, तालिबानमधील गटांचे मतभेद समोर येत आहेत. यातील काही गटांनी काबुलमधील नेत्यांना थेट इशारे दिले आहेत. हा अंतर्गत संघर्ष तालिबानच्या अफगाणिस्तानवरील सत्तेला धक्के देत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

चार दिवसांपूर्वी तालिबानमधील पश्तू गटाने मझार-ए-शरीफ भागातून ‘मखदूम आलम’ या तालिबानी कमांडरला अटक केली. तालिबान राजवटीचा उपसंरक्षणमंत्री मुल्ला फझेल याच्या आदेशांवर ही कारवाई केल्याचे तालिबानने जाहीर केले. मखदूम आलम हा तालिबानच्या फरयाब, जावझान आणि सर-ए-पूल या प्रांतांचा कमांडप्रमुख होता. याशिवाय मखदूम आलम हा तालिबानमधील उझबेक टोळीचा सर्वात मोठा कमांडर आणि धार्मिक नेता म्हणून देखील ओळखला जातो. त्यामुळे त्याच्या अटकेनंतर फरयाब प्रांतात उझबेक गटांनी संताप व्यक्त केला.

१२ जानेवारी रोजी उझबेक टोळीने फरयाब प्रांताची राजधानी मेमाना येथील तालिबानच्या मुख्यालयावर धडक देऊन इतर तालिबान्यांना निशस्त्र केले. त्याचबरोबर मखदूम आलमच्या सुटकेची मागणी केली. उझबेक टोळीने केलेल्या या कारवाईचे फोटोग्राफ्स व व्हिडिओ स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. यानंतर काबुलमधील तालिबानच्या नेतृत्वाने फरयाब प्रांतात आणीबाणी लागू करून मखदूम आलमच्या समर्थकांना इशारा दिला होता.

याला दोन दिवसही उलटत नाही तोच तालिबानने फरयाब प्रांतातील ताजिक टोळीचा मोठा कमांडर कारी वकील याला देखील ताब्यात घेतले. मखदूमच्या सुटकेबाबत बोलायचे आहे, असे सांगून तालिबानने कारी वकिलला मझार-ए-शरीफमध्ये बोलावून ही कारवाई केली. अशारितीने तालिबानने फरयाब प्रांतातील दोन टोळ्यांच्या प्रमुखांना अटक केली आहे. उझबेक टोळीचा उपप्रमुख तुर्क ओग्लू याने मखदूमच्या अटकेवरुन तालिबानच्या नेतृत्वाला धमकावले आहे.

उझबेक गटाचाकाही दिवसांपूर्वी तालिबानमधील वरदाक आणि लाघमानी टोळ्यांमध्ये देखील तीव्र मतभेदाच्या बातम्या समोर आल्या होत्या. वरदाक आणि लाघमानी टोळ्यांच्या प्रमुखांनी एकमेकांना संपविण्याच्या धमक्या दिल्या होत्या. तालिबानच्या नेतृत्वाची आपल्याला पर्वा नसल्याचे संकेत या दोन्ही टोळीप्रमुखांनी दिले आहेत. त्यामुळे काबुलमधील तालिबानच्या नेतृत्वाचे नियंत्रण सुटल्याचे दिसत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच तालिबानने अफगाणिस्तानच्या शेजारी असलेल्या उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तानला धमकावले होते. पाच महिन्यांपूर्वी अफगाणी वैमानिक व इंजिनिअर्स विमाने आणि हेलिकॉप्टर्स घेऊन शेजारी देशांमध्ये आश्रयासाठी गेले होते. उझबेकिस्तान व ताजिकिस्तानने ही विमाने आपल्या परत करावी, अशी मागणी करताना तालिबानने शेजारी देशांना गंभीर परिणामांची धमकी दिली होती.

leave a reply