व्हेनेझुएला युरोपिय देशांना इंधननिर्यात करणार

-अमेरिकेने बंदी उठविली

कॅराकस/वॉशिंग्टन – युरोपिय देशांनी रशियाकडून आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर बंदीचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या इंधननिर्यातीवरील निर्बंध उठविले आहेत. या निर्णयानुसार व्हेनेझुएला युरोपिय देशांना कच्च्या तेलाची निर्यात सुरू करणार आहे. पुढील महिन्यापासून ही निर्यात सुरू होणार असून ‘एनि’ व ‘रेप्सॉल एसए’ या युरोपिय कंपन्यांना कच्चे तेल आयात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

venezuela-oilमाजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे हुकुमशहा निकोलस मदुरो यांच्या राजवटीविरोधात जबर आर्थिक व राजनैतिक निर्बंध लादले होते. यात व्हेनेझुएलाच्या इंधनक्षेत्राला लक्ष्य करण्यात आले होते. बायडेन प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच हे निर्बंध शिथिलकरण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार व्हेनेझुएलाच्या इंधननिर्यातीवरील बंदी उठविण्यात आल्याचे दिसत आहे. हा निर्णय युरोपिय देशांनी रशियन तेलाच्या आयातीवर बंदीबाबत घेतलेल्या निर्णयाला प्रोत्साहन देणारा ठरेल, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

युरोपिय देशांला लागणाऱ्या कच्च्या तेलापैकी 30 टक्के कच्चे तेल रशिया पुरवितो. ही आयात वर्षअखेरपर्यंत बंद करण्यात येणार आहे. मात्र युरोपिय देशांना रशियन तेलाला ठोस पर्याय उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे जगातील इतर इंधनसंपन्न देशांकडून महागडे तेल खरेदी करण्याची धडपड युरोपिय देशांनी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी इराणनेही युरोपिय देशांना कच्चे तेल पुरविण्याचा प्रस्ताव दिल्याचे समोर आले होते. आता अमेरिकेने व्हेनेझुएलाला परवानगी देऊन युरोपिय देशांना रशियन तेलापासून तोडण्याच्या प्रयत्नांना अधिक वेग दिल्याचे दिसत आहे.

leave a reply