साऊथ चायना सीमधील चीनच्या कारवायांविरोधात व्हिएतनाम आक्रमक

- नव्या ‘आऊटपोस्टस्‌‍’सह प्रगत शस्त्रांच्या खरेदीच्या हालचालींना वेग

व्हिएतनाम आक्रमकहनोई/बीजिंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून साऊथ चायना सीमध्ये सुरू असणाऱ्या कारवायांना शह देण्यासाठी व्हिएतनामने आक्रमक धोरण स्वीकारले आहे. गेल्या काही महिन्यात व्हिएतनामने साऊथ चायना सीमधील वादग्रस्त ‘स्प्रॅटली आयलंड’ भागात नव्या आऊटपोस्टस्‌‍ची उभारणी सुरू केली आहे. त्याचवेळी अमेरिकेसह इस्रायल, भारत व युरोपिय देशांकडून नव्या संरक्षणयंत्रणांच्या खरेदीसाठी हालचालींना वेग दिला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या संरक्षण प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर काही प्राथमिक करार पार पाडल्याचा दावाही सूत्रांकडून करण्यात आला.

‘साऊथ चायना सी’मधील ‘स्प्रॅटली आयलंड’ भागात असलेल्या विविध बेटांवर चीन व व्हिएतनामसह आग्नेय आशियातील पाच देशांनी दावे सांगितले आहेत. त्यात मलेशिया, फिलिपाईन्स, तैवान यासारख्या देशांचा समावेश आहे. गेल्या दशकात 2013 ते 2016 या कालावधीत चीनने या क्षेत्रातील छोट्या बेटांवर मोठ्या प्रमाणात बांधकाम करीत संरक्षणतळ उभारले व संपूर्ण भागावर आपला दावा सांगण्यास सुरुवात केली. मात्र आंतरराष्ट्रीय यंत्रणांनी चीनचे दावे फेटाळले असून आग्नेय आशियाई देशांचा अधिकार मान्य केला.

व्हिएतनाम आक्रमकचीनने हा निर्णय मानण्यास नकार देत या भागातील संरक्षणसज्जता सातत्याने वाढविण्यावर भर दिला आहे. चीनच्या या कारवायांना शह देण्यासाठी अमेरिका व इतर देशांनी पुढाकार घेतला असून आग्नेय आशियाई देशांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या बळावर आग्नेय आशियातील छोट्या देशांनीही चीनविरोधात ठामपणे उभे राहत आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. फिलिपाईन्स व व्हिएतनाम हे देश यात आघाडीवर असून या देशांनी चीनविरोधात मोर्चेबांधणी करण्याचे संकेत दिले आहेत.

व्हिएतनाम आक्रमकगेल्या काही महिन्यात व्हिएतनामकडून ‘स्प्रॅटली आयलंड’च्या भागात सुरू झालेले बांधकाम व आऊटपोस्टस्‌‍ची उभारणी त्याचाच भाग ठरतो. ‘आशिया मेरिटाईम ट्रान्सपरन्सी इनिशिएटिव्ह’ने यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार, व्हिएतनामने 2022 मध्ये ‘स्प्रॅटली आयलंड’ क्षेत्रात 400 एकरहून अधिक जमिनीची भर घातली आहे. चीनच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी व्हिएतनामचा विचार करता या हालचाली लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या आहेत. व्हिएतनामकडून नऊ भागांमध्ये बांधकाम सुरू असून त्यात नामयित आयलंड, पिअर्सन रिफ, सँड के, टेनेट रिफ, लॅड रिफ, ॲलिसन रिफ, डिस्कव्हरी ग्रेट रिफ, कॉर्नवॉलिस साऊथ रिफ व बार्क कॅनडा रिफ यांचा समावेश आहे.

एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू करून व्हिएतनामने आपण ‘स्प्रॅटली आयलंड’ भागावरील आपला अधिकार सोडणार नसल्याचा संदेश चीन व इतर देशांना दिल्याचे मानले जाते. एका बाजूला हे बांधकाम सुरू असतानाच व्हिएतनामने आपल्या संरक्षणसज्जतेसाठीही पावले उचलली आहेत. यापूर्वी व्हिएतनाम संरक्षणसामुग्रीसाठी रशियावर मोठ्या प्रमाणात अवलंबून होता. मात्र रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्हिएतनामने त्यावर फेरविचार सुरू केला असून अमेरिका, इस्रायल, भारत व युरोपिय देशांकडून प्रगत शस्त्रे खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेकडून हेलिकॉप्टर्स, ड्रोन्स व अत्याधुनिक बोटींच्या खरेदीबाबत बोलणी सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

leave a reply